Ashadhi Ekadashi 2023 : भक्तांचा जनसागर! निवृत्ती महाराजांची पालखी थाटामाट पंढरपूरच्या दिशेनं रवाना

Sant Nivrutinath Maharaj Palakhi : संतमंडळींच्या पालख्या आता मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यातच आता निवृत्तीनाथ महाराज विठ्ठलभेटीसाठी निघाले आहेत. त्याचंच हे वृत्त   

सायली पाटील | Updated: Jun 2, 2023, 01:26 PM IST
Ashadhi Ekadashi 2023 : भक्तांचा जनसागर! निवृत्ती महाराजांची पालखी थाटामाट पंढरपूरच्या दिशेनं रवाना  title=
Ashadhi Ekadashi 2023 Sant Nivrutinath Maharaj Palakhi

योगेश खरेंसह विशाल सवने, झी मीडिया, नाशिक : Sant Nivrutinath Maharaj Palakhi : वारकऱ्यांना मे महिन्यापासूनच विठूरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते. संताच्या पालख्या पंढरीकडे निघण्यासाठी सज्ज होत असतात. या पालख्यांसोबत लाखो वारकरी देखील पंढरीच्या दिशेनं मार्गस्त होत असतात. 

जशी आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊली, देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेनं जात असतात तशाची त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्त होत असते. आज दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल. या पालखी प्रस्थान सोहळ्यात सुमारे 15 ते 20 हजार वारकरी सहभागी होत असतात. याच वारकऱ्यांच्या सुविधेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाल्याचं चित्र दिसून येतंय. 

50 दिंड्यांचा सहभाग! 

संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये 50 दिंड्या पोहोचल्या आहेत. या दिंड्यांचे चालक, मालक, टाळकरी, विनेकरी यांना निवृत्तीनाथ मंदिर प्रशासनाकडून श्रीफळ देवून मान देण्यात येतो.   त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या साधारण 450 किलोमीटरचा प्रवास आहे.  प्रत्येक दिवशी साधारण 20 किलोमीटरचा प्रवास हे वारकरी चालत असतात. यंदा पालखी सोहळ्याची सुरुवात जून महिन्याच्या सुरुवातीपासून होत आहे. राज्यात अद्याप पाऊस पडला नाही. उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी राज्याची अरोग्य यंत्रणा सुद्धा  सज्ज असल्याचं सांगण्यात आलंय. 

हेसुद्धा वाचा : ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?

पालखीचा पहिला मुक्काम 

श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरीकडे मार्गस्त झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकनगरीत श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरू गहिनीनाथ यांची समाधी आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अंतर चालण्यासाठी या पालखीला साधारण 27 दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये प्रवासात त्यांना हवामानाचा मारा सहन करावा लागणार आहे. पण, विठ्ठलभेटीची ओढ त्यांचा हा प्रवासही सुकर करेल यात शंका नाही.