कॅन्सर समजून उपचार करायला गेले निघाली लवंग, काय आहे प्रकरण?

जीवन मरणाचा प्रश्न, आयुष्यात सेकेंड ओपिनियन किती महत्वाचं? 

Updated: Feb 4, 2022, 11:02 AM IST
कॅन्सर समजून उपचार करायला गेले निघाली लवंग, काय आहे प्रकरण? title=

नागपूर : आज जागतिक कॅन्सर दिन. कॅन्सरबाबत समाजात अनेक समज - गैरसमज आहेत. अशावेळी आपलं कोणतंही दुखणं हे कॅन्सर तर नाही ना असा समज लोकांना होता. असंच काहीसं नागपूरमधील ३६ वर्षीय अनुषासोबत झालं आहे. फुफ्फुसाचा कॅन्सरची भीती वाटत असताना चक्क सात वर्षांपूर्वीची लवंग निघाल्याची घटना घडली आहे. 

३६ वर्षीय अनुषा यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून खोकल्याचा त्रास होता. गेल्या दोन-तीन महिन्यात हा त्रास फार वाढला होता. सोबत खोकल्याद्वारे दम लागणे, वजन कमी होणे, छातीमध्ये दुखणे व अधुनमधून थूंकीत रक्त येणे, अशी लक्षणेही त्यांना होती.

कॅन्सर नाही ही तर लवंग 

नेहमीच्या त्रासासाठी त्यांना त्यांच्या फॅमेली डॉक्टरला दाखवले. इंदोर येथील डॉक्टरांनी छातीचा सीटी स्कॅन करून कर्करोगाची शक्यता व्यक्त केली होती. यानंतर अनुषा यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. 

सेकेंड ओपिनयन घ्यावं या उद्देशाने अनुषा यांच्या कुटुंबियांनी नागपूरातील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांची भेट घेतली. डॉ. अरबट यांनी हा यांनी कर्करोग नसून, काहीतरी अडकले असल्याचे निदान केले.

त्यावर ब्रोन्कोस्कोपिक क्रायो बायप्सी, डायलेटेशन (फुगा) आणि फॉरेन बॉडी रिमुवल अशा प्रक्रिया करून तब्बल सात वर्षांपूर्वी अडकलेली लवंग बाहेर काढली. या प्रक्रियेसाठी कुठलीही चिरफाड करावी लागली नाही.

तोंडाद्वारे फुफ्फुसांमध्ये दुर्बिन (ब्रॉन्कोस्कोप) घालून पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. एकूणच यामुळे कर्करोगाची शक्यता व्यक्त केल्यानंतर जेव्हा लवंग निघाली तेव्हा अनुषा यांच्या परिवाराने सुटकेचा निश्वास घेतला.

कॅन्सर असल्याची भीती व्यक्त 

काही दिवसांपासून त्रास वाढल्याने तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केला. मात्र, त्यानंतरही बरं न वाटल्याने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सिटीस्कॅनमध्ये डाव्या फुफ्फुसाच्या खालील भागात गाठ व न्युमोनिया यांचे निदान झाले.

ही गाठ कर्करोगाची असू शकते, अशी शक्यता तेथील डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने ब्रॉन्कोस्कोपी करून बायस्पी घेण्यात आली. या रिपोर्टमधून काही निष्पन्न न झाल्याने सीटी गायडेड बायप्सी देखील करण्यात आली. त्यामध्येही कुठलेही निदान होऊ शकले नाही.

सात वर्षांपूर्वीची लवंग पडली भारी

सात वर्षांपूर्वी गळ्यात काहीतरी अडकले होते.  क्रायोबायप्सी नंतर आतली सुज कमी झाल्यावर ब्रॉन्कोस्कोपी करून तो भाग स्वच्छ केला तेव्हा तेथे काहीतरी अडकल्याचे स्पष्ट झाले.

त्या श्वासनलिकेमध्ये (ब्रॉन्कस) डायलेटेशन करून म्हणजे छोटा फुगा टाकत ती वाट मोकळी केली आणि लवंगीचा तुकडा बाहेर काढला. डाव्या फुफ्फुसाच्या खालील भागापर्यंत पोहचणे फार कठीण असते.

जर निदान झाले नसते तर किंबहुना फुफ्फुसाचा हा भाग कापावा लागला असता. मात्र, डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील बाकमवार, डॉ. परिमल देशपांडे, सुंगणीतज्ज्ञ डॉ. आशुतोष जयस्वाल यांनी हे आवाहन लिलया पेलले व प्रक्रिया यशस्वी केली. रुग्णाची तब्बेत पूणपणे बरी आहे.