नाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत

 दिनकर पाटील हे नाराज आहेत.  

Updated: Oct 2, 2019, 06:18 PM IST
नाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत title=

नाशिक : महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी तयारीही केली होती. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, पाटील यांच्यावर पक्षातील काही लोक नाराज होते. कारण महापालिकेत भाजपची सत्ता असताना सभागृह नेते दिनकर पाटील हे अनेकदा विरोधी भूमिका घेऊन भाजपलाच अडचणीत आणल्याचे बोलले जात होते. हेही कारण त्यांचा पत्ता कट करण्याचे ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.

यापूर्वी पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून भाजपच्या आमदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले होते. पालिकेतील सर्व घडामोडींची माहिती अधिवेशनात व्यस्त असणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दिनकर पाटील यांच्याकडे सभागृह नेतेपद ठेवायचे की नाही, यावर गांभीर्याने विचार सुरू होता. पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यास कोणत्याही क्षणी कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. तसेच त्यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी तयारी केली होती. मात्र, त्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने ते बंडाच्या तयारीत आहेत.