नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी स्थानिक पातळीवर विरोध होताना दिसून येत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही बाजुने आक्रमकता दिसून येत आहे. कल्याणामध्ये भाजपची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे कार्यकर्ते इरादेला पेटले असून स्थानिक आमदारांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेली शिवसेना बेलापूर मतदार संघात विद्यामान भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना विरोध केला आहे. भाजपचा हा मतदार संघ शिवसेनेला हवा होता. तशी स्थानिकांनी मागणी केली. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे शिवसैनिकांनी रस्तारोको आंदोलन केले. बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही मतदार संघ भाजपला दिल्याने रास्तारोको करण्यात आला. शिवसेना उपनेते विजय नहाटा यांना उमेदवारी देण्यात यावी, यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. उमेदवारी नाकारल्याने विजय नहाटा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून विजय नाहाटा यांना विधान परिषदेवर किंवा सिडकोचे अध्यक्ष पद देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विरोध मोडून काढण्यात येईल, अशीही एक शक्यता आहे.