पुणे : गर्भपात करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरवर कोयत्याचे वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यास या डॉक्टरला जबरदस्ती करण्यास येत होती. पण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बिडकर यांनी तसे करण्यास विरोध केला. या हल्ल्यात डॉ. बिडकर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, उपचारानंतर आता त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे गर्भपात करण्याच्या हेतून डॉक्टरकडे आले.
तपासणी केल्यानंतर गर्भ १६ आठवड्यांचाअसल्याचे त्यांच्या लक्षात आले. १२ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा गर्भ असल्यास केवळ ठराविक केसमध्येच गर्भपात करण्यास परवानगी असते. त्यामुळे डॉक्टरांनी असे करण्यास नकार दिला.
काही दिवसांपूर्वी त्या तरुणाचा डॉक्टरांना धमकीचा फोन आला. पण त्यालाही न जुमानल्याने चिडलेल्या तरूणाने शनिवारी रात्री पाच ते सहा जणांसह रूग्णालयात येऊन डॉक्टरवर कोयत्याने वार केले.