लातूर: युवासेना प्रमुख असलेले आदित्य ठाकरे हे सोमवारी लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. 'दुष्काळ गंभीर-शिवसेना खंबीर' हा नारा देत आदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागात फिरत आहेत. मात्र, यावेळी शिवसैनिकांच्या अतिउत्साहीपणामुळे पक्ष अडचणीत आला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडा येथून त्यांनी दुष्काळ दौऱ्याची सुरुवात केली.
'दुष्काळ गंभीर-शिवसेना खंबीर' अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देत असले तरी शिवसैनिक दुष्काळाबाबत फारसे गंभीर दिसत नाहीत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे लातूरच्या दुष्काळ दौऱ्यावर आले असताना शिवसैनिकांनी त्यांचे फटाके वाजवून स्वागत केले. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे आलेत याचे भानही शिवसैनिकांना राहिले नाही. केवळ नेत्यासमोर चमकोगिरी करण्याच्या नादात शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्याचे गांभीर्य घालवून टाकले. यावरून आता शिवसेनेचे नेते दुष्काळाविषयी खरेच गंभीर आहेत का, अशी शंका उपस्थित झाली आहे.
औसा तालुक्यातील बुधोडा, चलबुर्गा, किल्लारी आदी गावात आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी आदित्य ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्यादरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या टाकीचे लोकार्पण केले. लातूर जिल्ह्यातील दौरा झाल्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्रा या गावनाही त्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
लातूर जिल्ह्यातील औसा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघ हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतात. दरम्यान दिवसभराचा दौरा करून आदित्य ठाकरे हे सोलापूर येथे मुक्काम करणार असून उद्या सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेटी देणार आहेत.