नवी मुंबई - घरात लहान मुले असली की ती दंगा-मस्ती करतातच. अशावेळी पालक मुलांवर ओरडतात. पण नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये घरात मस्ती करते म्हणून जन्मदात्या आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला अंगावर मेणबत्तीचे चटके दिल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. पीडित मुलीचे पिता बुधवारी कामावरून घरी आल्यानंतर मुलीने आपल्या सोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. हे ऐकताच त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी मुलीची आई आणि तिला साथ देणारी संबंधित मुलीची काकू यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली.
संबंधित मुलगी बुधवारी संध्याकाळी घरात दंगा-मस्ती करीत होती. त्यावेळी आईने सुरुवातीला तिला शांत बसण्यास सांगितले. पण तिने त्याकडे दुर्लक्ष करीत आपला दंगा सुरूच ठेवला. यानंतर चिडलेल्या आईने मुलीच्या काकूच्या मदतीने तिला पेटत्या मेणबत्तीचे चटके दिले. हे सगळे घडल्यावर मुलगी एकदम शांत झाली. तिला वेदना असह्य होऊ लागल्याने ती रडू लागली. त्यानंतर वडील घरी आल्यावर तिने वडिलांना सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या अंगावरील चटक्यांचे व्रण बघितल्यावर वडिलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी मुलीची आई आणि काकू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या दोघींनाही पोलिसांनी अटक केली. मुलीला चटके का दिले, याचे कारण आईने अद्याप सांगितलेले नाही. नवी मुंबईतील पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.