कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका

गेल्याच महिन्यात कौमार्य चाचणीची एक धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली होती

Updated: Feb 7, 2019, 09:06 AM IST
कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका  title=

मुंबई : मुलींची कौमार्य चाचणी अर्थात व्हर्जिनिटी टेस्ट ही अनिष्ट प्रथा महाराष्ट्राच्या विविध भागांत अजूनही सुरू असल्याचं अनेक घटनांमधून स्पष्टपणे समोर आलं होतं. परंतु, अशी कौमार्य चाचणी करणाऱ्यांना राज्य सरकारनं आता जोरदार दणकाच दिलाय. 'कौमार्य चाचणी' ही अनिष्ट प्रथा यापुढे 'लैंगिक अत्याचार' समजला जाणार आहे, अशी घोषणाच राज्य सरकारनं केलीय. या संदर्भात महिला अत्याचारविरोधी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला जाणार आहे. लवकरच यासंदर्भात अधिसूचना जारी करून राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना त्याविषयी सूचित करण्यात येईल, असं गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी म्हटलंय.

गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली त्यात शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारानं जातपंचायतीविरोधी समिती सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची जुनाट अत्याचारी रुढींबाबत बैठक झाली. ज्या जमाती स्त्रियांना अपमानजनक वागणूक देत असतील त्या संबंधितांवर कडक करण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. आता दर दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.

अधिक वाचा : पोरींनो परंपरा उखडून फेका…!

 

गेल्याच महिन्यात कौमार्य चाचणीची एक धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली होती. पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचं लग्न एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीशी झालं. विशेष म्हणजे वधू आणि वर दोघेही उच्चशिक्षित असून नवऱ्या मुलानं लंडनहून आपलं शिक्षण पूर्ण केलंय... असं असतानादेखील त्यांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून मुलीची कौमार्य चाचणी करण्यात आली होती.

अधिक वाचा : जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून लंडनशिक्षित वराकडून वधुची 'कौमार्य चाचणी'

 

व्हर्जिनिटी टेस्ट किंवा कौमार्य चाचणी

कंजारभाट समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी (virginity test)  करण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याच्या अनेक घटना उघड झाल्यात. या कुप्रथेतून महिलांचं शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या रात्री तरुण-तरुणीच्या शरीरसंबंधामध्ये पांढऱ्या कपड्यावर रक्ताचा डाग न पडल्यास तरुणी या टेस्टमध्ये 'नापास' ठरते. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला पंचांसमोर कपडे उतरवणं, शरीराच्या नाजूक भागांना चटके देणं, उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढणं असे अनेक पद्धतीचे अमानवीय दंड दिले जातात.