Relationship : लग्नानंतर प्रत्येक मुलीचीच पाठवणी का केली जाते? मुलं का नाही सासरच्यांच्या घरी जाऊन राहत? हे असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले जातात. कारण, आजपर्यंत समाजात लग्नानंतर मुलीचीच पाठवणी होण्याची रित प्रचलित असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का?
लग्नबंधनात असणारी ही रित नेमकं काय सुचवू पाहते? काही कल्पना आहे का? हिंदू विवाहसंस्कृतीनुसार कन्यादानाच्या विधीमध्येच या प्रश्नाचं उत्तर मिळतं. या विधीदरम्यान आईवडिल मुलीला दान स्वरुपात सासरच्यांकडे देत नाहीत, तर ते आपल्या जबाबदारीतून मुक्त होत वराकडे मुलीची जबाबदारी सोपवतात.
मनु संहितेनुसारसुद्धा पत्नीच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणं, तिची काळजी घेणं ही पतीची जबाबदारी असल्याची धारणा आहे. या महान ग्रंथानुसार पत्नी लग्नानंतर पतीच्याच घरी जाते. ज्यानंतर पत्नीला आजन्म आनंदात ठेवणं ही पतीचीच जबाबदारी ठरते. आणखी एका वैदिक तथ्यानुसार स्त्री ही देवीचं रुप असते. ती लक्ष्मी, अन्नपूर्णा असून तिच अनेकांची हितचिंतक आहे. लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर हीच पत्नी सासरच्या घरची जणू लक्ष्मी असते. त्यामुळं या देवीस्वरुप लक्ष्मीला सोबत आणण्याची प्रथा आहे. लग्नानंतर जर पतीनं पत्नीला माहेरीच सोडलं तर वैदिक उल्लेखांनुसार हे पाप ठरतं.
अथर्ववेदातील संदर्भांनुसार वधू वरासाठी एखाद्या नदीसमान असते. एक अशी नदी जी तिच्या सागरासारख्या घरात जाऊन तिथं आपलं पावित्र्य मिसळते. लग्नानंतर सासरी गेलेली वधू तिच्या पतीच्याच कुटुंबाकडे स्वत:चं कुटुंब म्हणून पाहते आणि तिच्या अपत्यांपासून त्यांच्या पिढीची सुरुवात होते. विश्वाच्या रितीनुसार पत्नी लग्नानंतर पतीच्या घरी वास्तव्यास येते.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)