"...तर मी राजीनामा देऊन टाकेन," अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यानंतर ममता बॅनर्जींचं जाहीर आव्हान

Mamata Banerjee on Call to Amit Shah: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी फोन करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा कायम करा अशी विनंती केल्याचा दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 19, 2023, 08:04 PM IST
"...तर मी राजीनामा देऊन टाकेन," अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यानंतर ममता बॅनर्जींचं जाहीर आव्हान title=

Mamata Banerjee on Call to Amit Shah: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना फोन केल्याचा दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्याकडे तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा कायम करा अशी विनंती केल्याचा दावा त्यांनी केली आहे. या दाव्यानंतर ममता बॅनर्जी मात्र संतापल्या आहेत. जर हा दावा सिद्ध झाला तर मी मुख्यमंत्रीपद सोडेन असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं आहे. 

"मला आश्चर्य आणि धक्का बसला. जर मी अमित शाह यांना तृणमूलच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासंबंधी फोन केल्याचं सिद्ध झालं तर मी राजीनामा देईन," असं ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात अटींची पूर्तता होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेसचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. 

सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी दावा केला की, ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी अमित शाह यांना फोन केला आणि मध्यस्थी करत पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा दिला जावा अशी विनंती केली. सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींचे माजी सहकारी आहेत. 2021 विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे. 

दरम्यान यावेळी ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही सांगितलं. "कधीकधी शांतता चांगली असते. विरोधक एकत्र नाहीत असा विचार करु नका. आम्ही सर्व अस्तित्वात असून प्रत्येकजण एकमेकांसोबत चांगलं नातं जपत आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे वादळासारखं असेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

ममता बॅनर्जी यांनी यावेळी समलैंगिक विवाह कायदेशीर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यावरील प्रश्नावर सावधपणे उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, "मी काहीही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मला इतरांवर प्रेम करणाऱ्या लोकांवर प्रेम आहे. हे प्रकरण संवेदनशील असून मला लोकांच्या भावना पाहाव्या लागतील. मला न्यायालयाचा आदेश पाहावा लागेल, आणि मग आम्ही एक मत बनवू शकतो".