Caste Category On Hall Ticket: माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शालांत परिक्षांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉल तिकीटांवर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. पहिल्यांदाच हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. अवघ्या काही आठवड्यांवर आलेल्या महाराष्ट्र शिक्षण महामंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटांवरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या हॉल तिकीटांवर जातीचा उल्लेख असल्याच्या मुद्द्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. यावरुन आता शिक्षण महामंडळानेही स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसिद्ध लेखक हेरंब कुलकर्णी यांनी एचएससी आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटांवर जातीचा उल्लेख असल्याच्या मुद्द्यावरुन आक्षेप नोंदवला आहे. "दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे. हॉल तिकीट हे तात्पुरते आहे, मग यावर जातीचा उल्लेख करण्याची गरज काय?" असा सवाल हेरंभ कुलकर्णींनी विचारला आहे. "शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असताना, शाळा याची जबाबदारी पूर्णपणे घेत असताना, हॉल तिकिटावर उल्लेख करण्याचं कारण काय? महाराष्ट्रात सध्या जातीच्या मुद्द्यावर समाजव्यवस्था तुटेल की काय? अशी अवस्था असताना असे निर्णय घेताना शिक्षण विभागाने विचार करायला हवा," अशा कठोर शब्दांमध्ये हेरंब कुलकर्णींनी या निर्णयावरुन टीका केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. "हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख नाही तर प्रवर्ग/ कॅटेगरीचा उल्लेख करण्यात आला आहे. विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत हा हेतू आहे," असं गोसावी म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना त्यांनी, "शालेय प्रमाणपत्रांमध्ये जातीचा उल्लेख चुकल्यास विद्यार्थ्याला भविष्यात अडचण संभवू शकते. अशावेळी हॉल तिकीट उपयुक्त ठरु शकते. हॉल तिकीटवर कॅटेगरी नमूद करण्यात आल्याचा नकारात्मक अर्थ काढू नये," असंही सांगितलं आहे. "विद्यार्थ्यांच्या हितासाठीच निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण बोर्डाने दिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी, "दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटांवर जातीचा उल्लेख करणे गंभीर आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे," अशी मागणी केली आहे. सोमवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटं वितरित केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.