Maha Kumbh Mela 2025: भारतामध्येच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला जानेवारी महिन्यातील 13 तारखेपासून सुरुवात झाली. 26 फेब्रुवारीपर्यंत हा कुंभ मेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू राहणार असून, विविध साधूसंतांची हजेरी यादरम्यान कुंभ मेळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कोट्यवधींच्या संख्येनं भाविक आणि साधू, साध्वी, संतमंडळी या कुंभ मेळ्याला हजेरी लावतात.
अशा या पवित्र सोहळ्यात हजेरी लावण्याचा बेत तुम्हीही आखत असाल तर, 10 हजारांहून कमी किमतीमध्ये हे शक्य आहे. त्यासाठी फक्त काही गोष्टींचं पालन केलं जाणं अपेक्षित आहे.
रेल्वे असो किंवा बस प्रवास, प्रयागराजपर्यंत पोहोचणं फार सोपं आणि सोयीचं आहे. त्यातही रेल्वे प्रवास तुलनेनं अतीव फायद्याचा ठरतो. इथं प्रवाशांना जनरल सिटींग किंवा स्लीपर असे पर्याय 200 ते 1000 रुपयांमध्ये उपलब्ध असतात. अर्थात इथं दर प्रवासाच्या अंतरानुसार वरखाली होतात. भारत गौरवसारख्या ट्रेन या प्रवासामध्ये आणखी महत्त्वपूर्ण योगदान देतात.
दिल्ली, लखनऊ, कानपूर, वाराणासी यांसारख्या शहरांमधूनसुद्धा प्रयागराज इथं सहजपणे पोहोचता येतं. इथं प्रवासभाडं असतं साधारण 300 ते 800 रुपये. काही प्रवासी इथं नजीकच्या शहरामध्ये राहत खासगी वाहनांनी संगम पर्यंत पोहोचतात.
महाकुंभ मेळ्यामध्ये खर्चात काटकसर करत हजेरी लावणार असाल तर, इथं असणारे तंबू उत्तम पर्याय आहेत. इथं तुम्ही फक्त 1500 रुपये (एका रात्रीचा मुक्काम) इतक्या किमतीत वास्तव्य करू शकता. या तंबूंमध्ये सार्वजनिक न्हाणीघर, प्रकाशव्यवस्था अशा प्राथमिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
मुक्कामासाठी आणखी एक पर्याय म्हणजे आश्रम आणि धर्मशाळा. इथं संगम घाटनजीक असणारी बांगुर धरमशाला हा मुक्कामासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. आणखी एक पर्याय म्हणजे राही त्रिवेणी दर्शन. इथं एका रात्रीच्या मुक्कामासाठी 2000 ते 3000 रुपये इतकं भाडं आकारलं जातं. उत्तर प्रदेश सरकारनंही इथं येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना मुक्कामासाठी योग्य ठिकाण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाकुंभमध्ये आलं असता इथं राहण्यासाठी आणि खाण्यासाठी फारसा खर्च येणार नाहीय. इथं लंगर, सार्वजनिक भोजनालयं अशा अनेक पर्यायांचा वापर तुम्ही करु शकता. इतकंच नव्हे, तर इथं असणाऱ्या कैक आश्रमांमध्येही अन्नछत्र चालवलं जात आहे. याशिवाय इथं तुम्ही विविध ढाबे आणि चाट भंडार इथं स्थानिक खाद्यपदार्थांची लज्जत घेऊ शकता.
इथं होणारी गर्दी पाहता प्रवासासाठी सार्वजनिक दळणवळणाच्या सोयीसुविधा विचारात घ्या. शेअर टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय निवडा. प्रवासादरम्यान पुन्हा वापरता येतील अशा पाण्याच्या बाटल्या सोबत न्या. प्रसाधनासाठीच्या प्राथमिक गोष्टी, सुका खाऊ सोबत बाळगा. महाकुंभमध्ये गटागटानं फिरा. एकमेकांच्या संपर्कात राहा.