दोन इमारती कोसळल्या; २ ठार, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकले

पोलीस आणि एनडीआरएफची चार पथकं घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

Updated: Jul 18, 2018, 07:57 AM IST
दोन इमारती कोसळल्या; २ ठार, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकले title=
छायाचित्र सौजन्य: ANI

नवी दिल्ली: एक चार मजली आणि बांधकाम सुरू असलेली दुसरी सहामजली इमारत कोसळल्याने दोघेजण ठार झाले. तर, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ५० जण अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना ग्रेटर नोएडामध्ये मंगळवारी रात्री उशीरा घडली. प्राप्त माहितीनुसार दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, पोलीस आणि एनडीआरएफची चार पथकं घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

चारमजली इमारत सहा मजली इमारतीवर कोसळली

कोसळलेल्या दोन्ही इमारतील शेजारीशेजारी होत्या. त्यापैकी एक इमारत जुनी होती. तर, दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. जुनी इमारत बांधकाम सुरू असलेल्या नव्या इमारतीवर कोसळली. कोसळलेली इमारत चार मजली होती. तर, बांधकाम सुरू असलेली इमारत सहा मजली होती. चारमजली इमारत बांधकाम सुरू असेल्या इमारतीवर कोसळली. या इमारतीत कामगार झोपले होते. चार मजली इमारतीत अनेक कुटुंबे राहात होती. दरम्यान, रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने लोकांना बचावाची संधी फारशी मिळाली नाही. त्यामुळे दोन्ही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मदत व बचावकार्याला सुरुवात

दरम्यान, 'जिल्हा प्रशासन, पोलीस व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी  मदत व बचावकार्याला तातडीने सुरुवात केली आहे. मात्र, सध्या ढिगारा जास्त असल्याने अडकलेल्या जखमी व मृतांची निश्चित संख्या समजू शकलेली नाही.’, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी दिली आहे.