नवी दिल्ली : शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून दूग्धोत्पादनाकडे पाहिले जाते. भारत दूध उत्पादनाबाबतीत आघाडीवर आहे. पण प्रत्येक जनावरामागे मिळणाऱ्या सरासरी दूधाच्या उत्पादनामध्ये भारत अजूनही मागे आहे. भारतात प्रत्येक जनावरामागे सरासरी तीन लिटर दूध मिळते. तर ऑस्ट्रेलियात १६ टक्के आणि इस्रायलमध्ये ३६ टक्के इतकी आहे. दूधाची सरासरी किमान असल्याने बळीराजाची परिस्थिती चांगली नाही. दुसऱ्या ठिकाणी दु्ग्धजन्य पदार्थांचे व्यवसाय वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण भारतात तशी परिस्थिती नाही. दूधाचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दूध वितरक दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या वर्षी दूधाला वाढीव दर मिळावा. तसेच स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी दूधपुरवठा रोखून धरला होता. एकूणच दर जनावरामागे मिळणारे दूध आणि शेतकऱ्याची परिस्थिती पाहता दूधाच्या दरांचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागणार आहे.
इकॉनॉमिक्स टाइम्सनुसार, अमूल ब्रँडची मालकी कंपनी असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे आर एस सोढी यांनी सांगितले की, या वर्षात दूध दरवाढ निश्चित आहे. स्किम्ड दूधाच्या पावडरीचा कमी साठा आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पुरवठा ही या दरवाढीमागील मुख्य कारण आहेत. ते म्हणाले की, दर हिवाळ्यात दूध पुरवठ्यात १५ टक्क्यांनी वाढ होते. यावेळी २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमुल दरदिवशी २४८ लाख लिटर दूध खरेदी करते.
दूध पावडरची उपलब्धता आणि कमोडिटीच्या स्थिरबाजार मूल्यामुळे २०१७ पासून कोणत्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही.