सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणा, आयसीयूत दाखल महिलेचा डोळा उंदराने कुरतडला

महिलेचा डोळा उंदराने कुरतडल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालयाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

Updated: May 17, 2022, 07:22 PM IST
सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणा, आयसीयूत दाखल महिलेचा डोळा उंदराने कुरतडला title=

Shocking News : एमबीएस मेडिकल कॉलेजच्या (Medical College) रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिला रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णाचा एक डोळा उंदराने कुरतडला. ही बाब उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता रुग्णालय व्यवस्थापन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.

राजस्थानच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  रुग्णालयात कीटकनाशक फवारण्यात आलं होतं, त्यानंतरही महिलेचा डोळा उंदराने कुरतडला, या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितलं आहे. 

दुसरीकडे, महिलेच्या डोळ्याचा उंदराने चावा घेतल्याने तिच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाल्याचा दावा महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. 28 वर्षीय रुग्ण रुपवती गेल्या 46 दिवसांपासून एमबीएस हॉस्पिटलच्या न्यूरो स्ट्रोक युनिटमध्ये दाखल असून तिचे संपूर्ण शरीर अर्धांगवायू झालं आहे. तिला बोलताही येत नाही.

महिलेचे पती देवेंद्र सिंग भाटी यांनी सांगितले की सोमवारी रात्री 3 वाजेपर्यंत ते पत्नीजवळ आयसीयूमध्ये होते. त्यानंतर ते बाहेर गेले, परतल्यावर त्यांनी पत्नीच्या डोळ्यातून रक्त वाहत असल्याचं पाहिलं. याची माहिती त्यांनी तात्काळ डॉक्टरला दिली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.