मुंबई : महामार्गावरुन प्रवास करताना तुम्ही रस्त्यात लागत असलेले टोल नाके तर पाहिले असतील, या नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ज्यामुळे वाहतुक कोंडी देखील होते. हीच वाहतुक कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने एक युक्ती काढली आहे. महामार्गावरून प्रवास करताना टोल प्लाझावर लांबच लांब रांगा टाळण्यासाठी सरकारने आता इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम (FASTag) लागू केली आहे. यामुळे लोकांचा वेळ तर वाचतोच शिवाय टोल भरणेही सोपे जाते.
FASTag ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते तुमच्या मोबाईलवरूनच रिचार्ज करू शकता. पण कधी कधी FASTag रिचार्ज करताना लोक अपूऱ्या माहितीमुळे अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना नुकसान सहन करावा लागतो.
आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या रिचार्ज करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही स्वत:ची फसवणूक होण्यापासून वाचवू शकता.
पेटीएम, फोनपे किंवा इतर कोणत्याही पेमेंट अॅपवरून FASTag रिचार्ज करण्यापूर्वी, तुम्हाला वाहन क्रमांक टाकावा लागेल. जर तुम्ही चुकून चुकीचा नंबर टाकला तर तुमच्या खात्यातून पैसेही कापले जातील, परंतु तुमच्या गाडीसाठी मात्र FASTag निघणार नाही. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा टोल भरावा लागेल.
FASTag रिचार्ज करण्यापूर्वी, तुमचा FASTag बँक खात्याशी लिंक असणे महत्त्वाचे आहे. रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला बँक तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. तुम्ही चुकीचे तपशील दिले तरीही तुमचे रिचार्ज रद्द होईल आणि खात्यातून पैसेही कापले जाऊ शकतात.
जर तुम्ही तुमची कार एखाद्याला विकली असेल, तर प्रथम त्याचा FASTag निष्क्रिय करा. तुम्ही असे न केल्यास टोल प्लाझावर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.
जर तुम्हाला FASTag रिचार्ज करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा तुमचे अतिरिक्त पैसे कापले जात असतील तर तुम्ही NHAI च्या 1033 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. ही हेल्पलाइन फक्त फास्टॅगशी संबंधित समस्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय तुम्ही तुमच्या FASTag चा शिल्लक वेळोवेळी तपासत राहा. FASTag मध्ये पैसे कमी असतील, तर लगेच रिचार्ज करा. कारण तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे नसल्यास टोलमधून जाताना तुम्हाला दुप्पट शुल्क भरावे लागेल.