भारतात महामारी ठरत असलेल्या आत्महत्यांची काय आहेत कारणं?

नैराश्यपीडित आणि आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी

Updated: Jun 16, 2020, 07:56 PM IST
भारतात महामारी ठरत असलेल्या आत्महत्यांची काय आहेत कारणं? title=

नवी दिल्ली :   अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरात त्याला आलेल्या नैराश्याची चर्चा सुरु आहे. सुशांतच्या नैराश्याच्या कारणांवर चर्चा सुरु आहे. पण देशात दरवर्षी होणाऱ्या आत्महत्यांचा आकडा पाहिला तर नैराश्य आणि आत्महत्या ही एक सामान्य समस्या नसून ती एखाद्या मोठ्या साथीच्या आजारापेक्षा कमी नसल्याचं लक्षात येतं. विशेष म्हणजे दरवर्षी होणाऱ्या लाखो आत्महत्यांची कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात होणाऱ्या एकूण आत्महत्यांपैकी ४० टक्के आत्महत्या या जवळच्या नात्यांमुळेच केल्या जातात. म्हणजे कुटुंब, विवाह आणि प्रेम यामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि वादामुळे ४० टक्के आत्महत्या होतात. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २९ टक्के लोक कौटुंबिक समस्यांतून आत्महत्या करतात. तर ५ टक्के लोक वैवाहिक जीवनात सुखी नसल्याने जीवन संपवतात. प्रेमसंबंधातील समस्यांमुळे साडेतीन टक्के लोक मृत्युला कवटाळतात.

याशिवाय १७ टक्के लोक आजाराला कंटाळून आत्महत्या करतात. २.८ टक्के लोक कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. तर ४ टक्के लोक व्यसन आणि नशेमुळे आत्महत्या करतात.

आत्महत्यांबाबतची आकडेवारी पाहिली तर ती केवढी मोठी समस्या आहे हे लक्षात येईल. याबाबतचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०१६ या एका वर्षात २ लाख ३० हजार लोकांनी आत्महत्या केली.
  • हे प्रमाण म्हणजे दर १ लाख लोकांमध्ये १० लोक आत्महत्या करतात.
  • जगभरात दरवर्षी सुमारे ८ लाख लोक आत्महत्या करतात.

आत्महत्यांचे प्रकार

  • सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणामुळे आत्महत्या
  • देश किंवा समाजासाठी जीव देणे
  • आर्थिक, सामाजिक नुकसान झाल्याने जीव देणे
  • शोषणाची शिकार झाल्याने आत्महत्या करणे

आत्महत्येबाबत महत्वाचे मुद्दे

  • महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक
  • एकटे राहणाऱ्यांपेक्षा लग्न झालेल्या लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक
  • युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळातच आत्महत्या अधिक होतात
  • कमी शिकलेल्या लोकांपेक्षा शिकलेल्या लोकांमध्ये आत्महत्येचं अधिक प्रमाण

नैराश्य का येतं?

  • सतत, अधिकवेळ दुःखी असल्याने
  • एखाद्या गोष्टीत नाउमेद, निराश झाल्याने
  • मनात कोणत्याही प्रकारची अपराधाची भावना असणे
  • कोणीही निर्णय घेण्यात अयशस्वी झाल्याने
  • कोणाबरोबरही वेळ घालवायची इच्छा होत नसेल तर
  • कोणाशीही बोलण्याची इच्छा नसेल तर
  • योग्य झोप मिळत नसेल तर किंवा गरजेपेक्षा अधिक झोप घेतल्याने
  • मृत्यू किंवा आत्महत्येचा विचार आल्याने

नैराश्य हादेखिल मोठा आजार आहे

  • २० भारतीयांपैकी एक जण नैराश्याचा शिकार आहे
  • २० कोटी भारतीय कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने पीडित आहेत
  • १५ ते २९ या वयोगटातील १५ टक्के भारतीय मानसिक आजाराने पीडित आहेत
  • जगभरातील ४ व्यक्तिंपैकी एक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी मानसिक आजाराने पीडित असतो
  • जगभरात ४५ कोटी लोक मानसिक आजाराने पीडित

 

एकूणच नैराश्य आणि आत्महत्या ही जगभरातील समस्या असून या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी योग्य वेळी उपचार होणे गरजेचे आहे.