मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही एलीव्हेटेड कॉरीडॉर हवा; राहुल शेवाळेंची लोकसभेत मागणी

मुंबई रेल्वेसाठी एकच 'मुंबई झोन' असावा.

Updated: Jul 11, 2019, 08:13 PM IST
मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही एलीव्हेटेड कॉरीडॉर हवा; राहुल शेवाळेंची लोकसभेत मागणी title=

नवी दिल्ली: एमयूटीपी-3 ए अंतर्गत हार्बर रेल्वे मार्गावर होणाऱ्या एलिव्हेटेड कॉरीडॉर प्रमाणेच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही एलिव्हेटेड कॉरीडॉर करावा, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी गुरुवारी लोकसभेत केली. तसेच, मुंबईतील रेल्वेसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी एकच 'मुंबई झोन' ची निर्मिती करावी, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली. रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांना शेवाळे यांनी हात घातला.

एमयूटीपी- 3 ए च्या माध्यमातून हार्बर रेल्वे मार्गावर होणाऱ्या एलिव्हेटेड कॉरीडॉर मुळे हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट स्थानक ते विरार या मार्गावरही एलिव्हेटेड कॉरीडॉर करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. 

मुंबईत या घडीला मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे असे दोन झोन आहेत. त्यामुळे मुंबईतील रेल्वेच्या एकत्रित विकासावर मर्यादा येत आहेत, ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून देत खासदार शेवाळे यांनी मुंबई रेल्वेसाठी एकच 'मुंबई झोन' असावा, अशी मागणीही केली. याचबरोबर, सध्या मध्य रेल्वेच्या डिव्हिजनमध्ये गणल्या जाणाऱ्या हार्बर रेल्वेसाठी स्वतंत्र 'हार्बर डिव्हिजन' तयार करून त्यात ट्रान्स हार्बर, बेलापूर-उलवे रेल्वे यांचाही समावेश करावा, असेही खासदार शेवाळे यांनी सुचविले.
 
खासदार शेवाळे यांनी केलेल्या विशेष मागण्या
- महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेमध्ये टॉयलेटची व्यवस्था करावी.
- गर्भवती महिलांना अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कपार्टमेंट ची सुविधा प्रत्येक ट्रेनमध्ये करावी.
- फ्री वायफाय प्रमाणेच प्रत्येक फलाटावर फ्री टॉयलेट करावे.
- लोकल गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी आवश्यक तिथे रेल्वे ओलांडण्यासाठी फाटक लावले जावे.
- प्रवाशांची गर्दी, फेरीवाल्यांचा विळखा, वाहतूक कोंडी या आणि अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी विचाराधीन असलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाला सुरुवात करावी.
- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्याजागी त्वरित अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
- रेल्वे फलाटांच्या उंचीबाबत नव्याने अभ्यास करून आवश्यक त्याठिकाणी फलाटांची उंची वाढवावी.