टीसीने प्रवाशाला डब्यात झोपवून पट्ट्याने मारलं, दुसरा त्याच्या अंगावर बसला; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये टीसी आणि कोच अटेंडंटकडून प्रवाशाला बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत टीसी प्रवाशाला शिव्यांची लाखोली वाहताना पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 10, 2025, 01:54 PM IST
टीसीने प्रवाशाला डब्यात झोपवून पट्ट्याने मारलं, दुसरा त्याच्या अंगावर बसला; धक्कादायक VIDEO व्हायरल title=

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये टीसी आणि कोच अटेंडंटकडून प्रवाशाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अमृतसर-कटिहार एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये टीसी प्रवाशाला शिव्यांची लाखोली वाहताना पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे. दुसरीकडे कोच अटेंडंट त्याच्या अंगावर बसला असून नंतर लाथा घालताना दिसत आहे. प्रवाशाने दारुच्या नशेत टीसीवर हात उचलल्यानंतर त्यांनी मारहाण केली असं सांगितलं जात आहे. प्रवाशी ट्रक ड्रायव्हर असून शेख तझहुद्दीन अशी त्याची ओळख पटली आहे. तो बिहारच्या सिवन येथून दिल्लीला निघाला होता. 

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कोच अटेंडंट विक्रम चौहान आणि सोनू महतो यांच्यासह M2 कोचमध्ये त्याने मद्यप्राशन केलं होतं. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, दारुच्या नशेत त्याने काही महिला प्रवाशांसह गैरवर्तन केलं. विक्रम चौहान आणि टीसी राजेश कुमार मध्यस्थी करण्यासाठी आले असता शेख तझहुद्दीन याने त्यांच्यावर हात उचलला आणि परिस्थिती बिघडली. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत टीसी आणि कोच अटेंडंट प्रवाशाला शिव्या घालताना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतानाही दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओत टीसीने प्रवाशाला खाली पाडलेलं असून, चौहान त्याच्या अंगावर बसलेला दिसत आहे. 

धीरज यादव या प्रवाशाने पोलिसांना सांगितलं की, कोच अटेंडंटने प्रवाशाकडून पैसे घेतले होते आणि त्यानंतर मद्य पार्टीत सहभागी झाला होता. "कोच अटेंडंटने प्रवाशाकडून पैसे घेतले आणि सीटवरुन बसून पेग बनवले. मद्यप्राशन केल्यानंतर प्रवाशाने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर अटेंडंटने टीसीला बोलावलं. यादरम्यान प्रवाशाने टीसीच्या कानशिलात लगावली," असं धीरज यादव यांनी सांगितलं आहे.

घटनेची माहिती मिळताच, रेल्ले पोलीस पोहोचले आणि त्यांनी दारुच्या नशेत असणाऱ्या प्रवाशाला खाली उतरवलं. तसंच टीसीला ताब्यात घेण्यात आलं. यादरम्यान कोच अटेंडंट चौहान मात्र गायब झाला होता आणि ट्रेनमध्ये सापडला नाही. 

प्रवाशाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन अटेंडंट आणि टीसीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेने टीसी राजेश कुमार यांना निलंबित केलं असून, विभागीय मुख्यालयात रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन अटेंडंटनाही निलंबित करण्यात आलं आहे. काही प्रवाशांनी मद्यावस्थेत असणाऱ्या प्रवाशाविरोधातही तक्रार दिली आहे. 

घटनेची दखल घेत रेल्वेने दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. त्यावेळी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल नंबर रेल्वे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरुन घटनेची अधिक माहिती घेता येईल.