मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यातच, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
यावेळी पत्रकारांनी 'यंदा कुणाच्या शुभेच्छा महत्त्वाच्या वाटतात? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना केला असता त्यांनी उत्तर देणं जवळजवळ टाळलंच... 'वाढदिवसानिमित्त ज्या राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार, पण सर्वसामान्य जनतेच्या शुभेच्छा तितक्याच महत्वाच्या आहेत!' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आज वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यंदाच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरेंना त्यांच्या नव्या भावानं शुभेच्छा दिल्यात. लोकसभेतल्या मोदींची गळाभेट घेतल्यानंतर 'सामना'मध्ये 'भावा जिंकलसं' या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली. राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं. आज उद्धव ठाकरेंच्या याच 'नव्या' भावानं त्यांना आज ट्विटवर शुभेच्छा दिल्या. २०१९ निवडणुकीआधी आधी शिवसेना आणि भाजपमधला दुरावा, शिवसेनेची मोदींच्या कारभारावर साततत्यानं होणारी टीका, भाजप अध्यक्ष अमित शाहांनी स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याच्या दिलेल्या सूचना, काँग्रेसकडून भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न... या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा बरचं काही सांगून जाणाऱ्या आहेत.
Best wishes to Shri Uddhav Thackeray ji, on his birthday. I wish him good health and happiness always.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2018
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असले, तरी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत. त्यांनीही ट्विटरवरून शिवसेनापक्षप्रमुखांना उत्तम आरोग्यासाठी अभिष्टचिंतन केलंय.
Birthday wishes to Shri Uddhav Thackeray. May Almighty bless him with a long and healthy life in service of society.
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2018