मुंबई : माऊण्ट एव्हरेस्टवर २६ जानेवारीला आगळा वेगळा फॅशन शो होणार आहे. पर्यावरणासंदर्भात जनजागृतीसाठी या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलंय. माउंट एवरेस्टच्या बेस कॅम्पवर हा फॅशन शो रंगणार आहे. २६ जानेवारीला १२ देशांच्या १७ मॉडेल्स या फॅशन शोमध्ये त्यांचा जलवा दाखवणार आहेत. भारत आणि नेपाळनं मिळून या फॅशन शोचं आयोजन केलंय.
या फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी जगभरातून २४५ मॉडेल्सचे अर्ज आले होते. पण माऊण्ट एव्हरेस्टवर फॅशन शो असल्यानं आरोग्य चाचण्यांमध्ये फक्त १७ मॉडेल्स उत्तीर्ण झाले. या १७ मॉडेल्सना १४० किलोमीटर अंतर ट्रेकिंग करुन पार करावं लागणार आहे.
या फॅशन शोची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये होणार आहे. त्यामुळे ती टीमही या फॅशन शोला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या फॅशन शोकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.
या फॅशन शोसाठी जेवढे मॉडेल्स येणार आहेत, ते घरुन निघाल्यापासून ते हा फॅशन शो संपून परत काठमांडू एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत जेवढं कार्बन उत्सर्जन होईल, ते ट्रॅक करण्यासाठी एक ट्रॅकिंग डिव्हाईस या मॉडेल्सना लावण्यात येणार आहे आणि कार्बन उत्सर्जनचं जेवढं प्रमाण असेल, तेवढ्या प्रमाणात त्यांना झाडं लावावी लागणार आहेत.
एव्हरेस्ट चढणारे बरेच जण आहेत. पण एव्हरेस्टवर जाऊन जलवे दाखवण्याची संधी या सतरा जणांना मिळणार आहे. आता पर्यंत कधीही न पाहिलेला फॅशन शो २६ जानेवारी रोजी होणार आहे.