सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५ रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दर मंगळवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत.
या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1740 रुपये झाली आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ केली होती. 1 जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती, तर 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी करण्यात आली होती.
मात्र, दरम्यान घरगुती सिलेडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) फक्त 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेडरच्या किमती वाढवल्या आहेत, पण घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना विकला जात आहे, तर कोलकातामध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजीची किंमत 802.5 रुपये आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 918.5 रुपये आहे.
महिलांच किचन बजेट हे मुख्यतः गॅस सिलेंडरवर अवलंबून असतो. सणासुदीला नवे पदार्थ बनवण्याचा महिलांचा कल असतो. असं असताना घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ न झाल्यामुळे महिलांची चिंता मिटली आहे.
आजपासून कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1850.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1802 रुपयांना मिळत होता. मुंबईत हा सिलेंडर 1692.50 रुपयांना मिळेल, जो आधी 1644 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये सिलिंडर 1903 रुपयांना मिळेल जे आधी 1855 रुपये होते.
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. हा बदल महत्त्वाचा आहे कारण येत्या गुरुवारपासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. यानंतर फक्त 10 दिवसांनी दसरा येणार आहे. दिवाळीसारखे मोठे सण 15 दिवसांनी आणि छठ पूजा सहा दिवसांनी येत आहेत. याआधीही गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे लोकांना त्रास होऊ शकतो.