कोलकाता हादरलं! बांगलादेश दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा अंदाधुंद गोळीबार, महिलेचा मृत्यू

सुरक्षा कर्मचार्‍यांने स्वयंचलित रायफलने अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात भीतीची वातावरण

Updated: Jun 10, 2022, 03:55 PM IST
कोलकाता हादरलं! बांगलादेश दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा अंदाधुंद गोळीबार, महिलेचा मृत्यू title=

कोलकाता : पश्चिम बंगालची  (West Bengal) राजधानी कोलकाता इथल्या पार्क सर्कस परिसरात असलेल्या बांगलादेश दूतावासाच्या (Bangladesh Embassy) सुरक्षा कर्मचार्‍यांने त्याच्या स्वयंचलित रायफलने अंदाधुंद गोळीबार केला. यात रस्त्यावरुन जात असलेल्या एका महिलेला गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

गोळीबारानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या सुरक्षा कर्मचाऱ्याने गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालं नसून कोलकाता पोलीस (Kolkata Police) तपास करत आहेत. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. चोडूप लेपचा असं या घटनेतील मृत सुरक्षी कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो दार्जिलिंगचा रहिवासी होता आणि आर्म्स पोलिसांच्या 5 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता.

सीसीटीवी फुटेजवरुन तपास सुरु
एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक सुरक्षा कर्मचाऱ्यांने त्याच्या ऑटोमॅटिक रायफलने गोळीबार सुरू केला. त्याने किमान 8-10 राउंड फायर केले. यात स्कूटीवरुन जाणाऱ्या एका महिलेला गोळी लागली. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर सुरक्षा जवानाने स्वत:वरही गोळी झाडली. 

ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळाची नाकाबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत आहे. सध्या या संदर्भात बांगलादेश दूतावासाकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.