Jamiat Ulema E Hind Chief Maulana Mahmood: दिल्लीच्या रामलीला मैदानात (Delhi Ramleela Gound) जमीयत उलेमा-ए-हिंदच्या (Jamiat Ulema-E-Hind) 34 व्या अधिवेशनात मौलाना महमूद मदनी (Maulana Mahmood Madni) यांनी मोठं विधान केलं आहे. आपलं भाजपा-राष्ट्रीय स्वंयेसवक संघाशी (BJP-RSS) कोणतंही शत्रुत्व नसल्याचं मदनी यांनी म्हटलं आहे. पण धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव होता कामा नये असं स्पष्ट करताना त्यांनी आमच्यात वैचारिक मतभेद असल्याचं सांगितलं.
RSS च्या संस्थापकांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल अनेक आक्षेप आहेत. पण सध्याच्या RSS प्रमुखांनी केलेली विधानंही दुर्लक्षित केली जाऊ शकत नाहीत. मतभेद दूर करण्यासाठी आम्ही आरएसएस प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचं स्वागत करतो असं मौलाना महमूद मदनी यांनी सांगितलं आहे.
अधिवेशनात बोलताना मदनी यांनी स्पष्ट केलं की, "मुस्लिमांना पैगंबरांचा अपमान मंजूर नाही. पैंगंबराविरोधात वक्तव्य करणं योग्य नाही". पुढे ते म्हणाले की, "शिक्षणाचं भगवीकरण केलं जात आहे. तसंच धर्माची पुस्तकं इतरांवर थोपवणं योग्य नाही. हे मुस्लिमांसाठी स्विकारार्ह नाही. भारतीय संविधानाला हे धरुन नाही".
अधिवेशनात मौलान महमूद यांनी सांगितलं की, "पसमांदा मुस्लिमांशी भेदभाव केला जात आहे. पण जमीयत उलेमा-ए-हिंद पसमांदा मुस्लिमांच्या आरक्षणासाठी लढणार आहे. पसमांदा मुस्लिमांना आरक्षणाची गरज आहे. जातीच्या आधारे होणाऱ्या भेदभावाबद्दल आम्हाला खेद आहे". प्रत्येक मुस्लिम समान असून, इस्लाममध्ये जातीच्या आधारे होणारा भेदभाव मंजूर नाही असंही त्यांनी म्हटलं.
महमूद मदनी यांनी यावेळी तुर्कीमधील भूकंपानंतर मोदी सरकार करत असलेल्या मदतीचं कौतुक केलं. तुर्कीला सरकारकडून केली जाणारी मदत ही फक्त प्रसिद्धीसाठी नाही. सरकार संकटात सापडलेल्या तुर्कीला शक्य ती सर्व मदत करत आहे. हा भारतच्या परदेशी धोरणाचा भाग आहे असं ते म्हणाले.