HO Railway Quota: दूरवरच्या प्रवासासाठी भारतातील बहुतांशजण रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दीही नेहमीच पाहायला मिळते. कन्फर्म तिकिट असेल तरच तुमचा प्रवास आरामदायी होऊ शकतो. त्यामुळे कन्फर्म तिकिटासाठी खूप स्पर्धा पाहायला मिळते. या कारणास्तव बरेच लोक अनेक दिवस आधीच आपला प्रवास बुक करतात. असे असले तरी अनेकदा प्रवाशांच्या पदरी निराशाच पडते. रेल्वेमध्ये तिकीट कन्फर्म करण्यासाठी प्रवासी जीवाचे रान करतात. काहीजण तिकिट बुकींगला सुरुवात होण्याच्या वेळेत ऑनलाइन बुकींगचा प्रयत्न करतात. भल्या पहाटे तिकीट विंडोवर जाऊन रांगा लावतात. तसेच तिकिट कन्फर्म करण्यासाठी विविध प्रकारचे कोटाही वापरले जातात. तरीही अनेकांना कन्फर्म तिकिट मिळत नाही. पण रेल्वेचे असे काही कोटा असतात, ज्यामध्ये तुम्हाला कन्फर्म तिकिट मिळू शकते.
हेडक्वार्टर कोटा (HO) वापरुन तुम्हाला तुमचे प्रतीक्षा तिकीट लगेच कन्फर्म होते. असे असताना या कोट्यासाठी काही अटी आणि शर्थी आहे. तुमच्यासाठी प्रवास करणे अत्यंत महत्वाचे असते तेव्हाच तुम्ही या कोट्याचा वापर करु शकता.
HO कोटाला मुख्यालय कोटा देखील म्हणतात. हा एक विशेष प्रकारचा कोटा आहे जो वरिष्ठ रेल्वे अधिकारी, सरकारी पाहुणे आणि व्हीआयपी यांच्यासाठी राखीव असतो. असे असले तरी काही आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी याचा वापर करतात. व्हीआयपी, खासदार, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरकारी अधिकारी यांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी हा कोटा राखीव असतो. रेल्वे अधिकारी त्यांच्या अधिकृत कामासाठी HO कोटाचा वापर करु शकतात.
सर्वसामान्य प्रवासी एचओ कोट्यातून प्रवास करु शकतात का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक प्रवास करावा लागतो आणि ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसते, तेव्हा HO कोटा वापरून तिकीट कन्फर्म करता येते. सामान्यतः HO कोटा सामान्य माणसाला वापरता येत नाही. पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सामान्य प्रवाशांना परवानगी मिळते. जसे की गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास, रेल्वे अधिकारी सामान्य माणसाला एचओ कोटा देऊ शकतात. एचओ कोटा अंतर्गत तिकीट निश्चितीची कोणतीही हमी नसते. तो निर्णय रेल्वेचे अधिकारी घेतात.
तिकीट बुकिंगच्या वेळी HO कोटा उपलब्ध नसतो. प्रवाशाला प्रथम सामान्य श्रेणीतील तिकीट बुक करावे लागेल. तिकीट प्रतीक्षा यादीत असल्यास प्रवासी रेल्वे मुख्यालयात जाऊन एचओ कोट्यासाठी अर्ज करू शकतात. या कोट्याअंतर्गत अर्जासोबत तुम्हाला प्रवासाचे कारण आणि आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील. रेल्वे अधिकारी अर्जाची तपासणी करतात आणि त्यांना प्रवासाचे कारण आवश्यक वाटल्यास, एचओ कोटा अंतर्गत तिकीट कन्फर्म केले जाते.