Independence Day PM Modi Speech: 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2023) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर (Red Fort) तिरंगा फडकावला आहे. देशातील 140 कोटी भारतीयांना उद्देशून कुटुंबातील एक सदस्य असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 90 मिनिटांच्या भाषणात केला. भाषणाच्या सुरुवातीलाच मणिपूर हिंसाचाराचा (Manipur Violence) उल्लेख करत सगळा देश मणिपूरसोबत आहे असे म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भविष्यातील अनेक बदलांचे संकेत दिले आहेत. आर्थिक योजना, विकास, महिला, कामगार आणि शेतकरी अशा विषयांना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात प्राधान्य दिलं.
2047 मध्ये आपण भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून पाहू शकण्यासाठी पुढील पाच वर्षे खूप महत्त्वाची आहेत. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणावर भाष्य करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला. कुटुंबवादाची कीड देशाला पोखरत आहे. त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढत राहीन - पंतप्रधान मोदी
"काही विकृती आपल्या समाजव्यवस्थेत शिरल्या आहेत. संकल्प सिद्ध करायचा असेल, तर तिन्ही वाईट गोष्टींशी लढणे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचाराच्या किडीने देशाच्या सामर्थ्याला पोखरलं आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती, त्याविरुद्ध लढा. भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढत राहीन. दुसरे म्हणजे, कुटुंबवादाने आपला देश उद्ध्वस्त केला आहे. देशातील जनतेचे हक्क हिरावून घेतले आहेत. तुष्टीकरणाने देशाच्या मूळ विचारसरणीलाही कलंक लावला आहे. म्हणूनच प्रिय कुटुंबियांनो, या तीन वाईट गोष्टींविरुद्ध आपल्याला ताकदीने लढायचे आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"2014 मध्ये, मी बदलाचे वचन दिले आणि ते पूर्ण केले. 2019 मध्ये तुम्ही पुन्हा आशिर्वाद दिले आणि मला परत आणले. आगामी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. पुढच्या वेळी 15 ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी देशाचे यश, तुमची ताकद, जिद्द आणि यशाचा गौरव तुमच्यासमोर आणखी आत्मविश्वासाने मांडेन. तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच मी आलो आहे. तुमचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तुमचा सेवक राहण्याचा संकल्प असलेला मी माणूस आहे," असे पंतप्रधान म्हणाले.
मोदी सरकारची महिलांसाठी ड्रोन योजना
ग्रामीण भागांत दोन कोटी लक्षाधीश महिला तयार करण्यासाठी नरेंद्र मोदींनी ड्रोन योजना राबवणार असल्याचं सांगितलं. ":शेती क्षेत्रात तंत्रज्ञान यावं यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना आम्ही ड्रोन चालवण्याचं, दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. अशा हजारो महिलांना भारत सरकार ड्रोन देईल. त्याची सुरुवात आम्ही 15 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून करणार आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर
"मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची बातमी येत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे," असेही पंतप्रधान म्हणाले.