अंत्यसंस्कारावरुन परतताना मधमाशांचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, चौघे जखमी

Honey Bee Attack: मधमाशांनी केलेला हा हल्ला इतका भीषण होता की अनेकांना तिथून पळही काढता आला नाही. या हल्ल्यात अनेक गावकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र या हल्ल्यात एका गावकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2023, 03:33 PM IST
अंत्यसंस्कारावरुन परतताना मधमाशांचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, चौघे जखमी title=
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली

Honey Bee Attack: मध्य प्रदेशमध्ये एक फारच धक्कादायक घटना घडली आहे. येथे अत्यसंस्कारावरुन घरी परतणाऱ्या काही लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. हा हल्ला एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की या गटातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी एकाच प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला बडवानी येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे.

एक ठार, एक गंभीर अन् तिघे जखमी

अंत्यसंस्कारावरुन परतणाऱ्यांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एका गावकऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. ही घटना 12 ऑगस्ट रोजी धार येथील खेरवामध्ये घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, खेरवा गावातील रहिवाशी असलेल्या जाम सिंह यांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली. अंतयात्रा निघाली. स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावकरी घराकडे परत येत असतानाच मधमाशांनी एका गटावर हल्ला केला. अचानक मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मधमाशांची संख्या एवढी जास्त होती की अनेकांना पळून जाण्यासही वेळ मिळाला नाही. या हल्ल्यामध्ये बोंदर सिंह नावाच्या गावकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर 4 जण मधमांशांच्या या हल्ल्यात जखमी झाले. चौघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला बडवानी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.

...म्हणून मधमाशांनी केला हल्ला?

स्मशानभूमीजवळच झालेल्या मधमाशांच्या या हल्ल्यामागील कारणासंदर्भात बोलताना गावकऱ्यांनी धुरामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्ती केली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी संपूर्ण परिसरामध्ये धूर झाला. याच कारणामुळे मधमाशांचं पोळं उठलं आणि त्यांनी लोकांवर हल्ला केला. सामान्यपणे मधमाशांना पळवून लावण्यासाठी धुराचा वापर केला जातो. अनेकदा मधाचं पोळं काढण्यासाठी अनेकदा नारळाच्या शेंड्या जाळून जाणूनबुजून धूर केला जातो. धुरामुळे मधमाशा सैरभैर होऊन पोळ्याबाहेर येतात. अशावेळेस माशा अधिक आक्रमक असतात. चिता जळण्यास सुरुवात झाल्यानंतर धुरामुळे मधमाशा पोळ्याबाहेर पडल्या असाव्यात आणि त्यांनी अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांवर हल्ला केला असावा असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. मधमाशांनी दंश केल्याने अनेकांच्या शरीरावर जखमा झाल्या. किरकोळ जखमी झालेल्यांवर प्रथामिक उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पंचक्रोषीत या मधमाशांच्या हल्ल्याची चर्चा आहे.