शिमला: पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यामध्ये दोन व्यक्ती पाच लाखाची लाच देण्यासंदर्भात बोलत होत्या. या क्लीपच्या आधारे दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत हिमाचल प्रदेशातील आरोग्य यंत्रणेचे संचालक ए.के. गुप्ता यांना ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
या पार्श्वभूमीवर बुधवारी राजीव बिंदल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे राजीनामा सोपवला. हा राजीनामा तात्काळ मंजूरही करण्यात आला. मात्र, आपण नैतिक जबाबदारी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचा दावा बिंदल यांनी केला आहे. जेणेकरुन या प्रकरणाच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये, असे बिंदल यांचे म्हणणे आहे.
हक्काचे पैसे केंद्राकडून मिळाले नाहीत- अनिल परब
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. परंतु, बिंदल यांनी या घोटाळ्याशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पेशाने डॉक्टर असलेले राजीव बिंदल हे पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या प्रकरणामुळे हिमाचल प्रदेशात भाजप पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे. जे.पी. नड्डा यांनी जानेवारी महिन्यात राजीव बिंदल यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, अवघ्या १४३ दिवसांत त्यांच्यावर पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे.