'तुझ्यात हिंमत असेल तर जॅकी श्रॉफला अभिनय करायला लाव,'...जेव्हा नसरुद्दीन शाह यांनी दिलं जाहीर आव्हान, म्हणाले 'लाकडाला...'

बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी कशाप्रकारे 'परिंदा' (Parinda) चित्रपटात जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) कच्चा लिंबू म्हणण्यापासून ते फिल्मफेअरपर्यंत प्रवास झाला याचा उलगडा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 24, 2024, 09:46 PM IST
'तुझ्यात हिंमत असेल तर जॅकी श्रॉफला अभिनय करायला लाव,'...जेव्हा नसरुद्दीन शाह यांनी दिलं जाहीर आव्हान, म्हणाले 'लाकडाला...' title=

बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) 12th फेल, परिंदा, शिकारा यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. परिंदा चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. नुकतंच त्यांनी या चित्रपटात जॅकी श्रॉफला कास्ट करण्यामागील एक रंजक किस्सा सांगितलं आहे. त्यावेळी जॅकी श्रॉफला 'wooden actor' म्हणजेच ज्याला अजिबात अभिनय येत नाही असा अभिनेता म्हटलं जायचं. त्याचं प्रमाण इतकं होतं की, नसरुद्धीन शाह यांनी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर आव्हान दिल्यानंतर जॅकी श्रॉफला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला होता. गोवा येथे सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या चर्चेदरम्यान विधू यांनी परिंदामधील अनुभवाने जॅकीला एक चांगला अभिनेता होण्यासाठी कशाप्रकारे प्रेरित केले याची आठवण सांगितली.

त्यांनी सांगितलं की, "प्रत्येकजण जॅकीला वूडन अॅक्टर म्हणत होतं. त्याला प्रत्येकजण सांगत होतं आणि मलाही तू जॅकीला अभिनय करायला लावू शकत नाहीस असं सांगत होतं". खरं तर जॅकी श्रॉफची भूमिका आधी नसरुद्धीन शाह निभावणार होते. मात्र त्यांचं आणि विधू विनोद चोप्रा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आणि त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. "नसीर खरं तर चित्रपटात काम करणार होता. पण आमच्यात भांडण झालं आणि  त्याने काम करण्यास नकार दिला. मी म्हटलं ठीक आहे. तो म्हणाला, जर तू महान दिग्दर्शक असशील तर जॅकी श्रॉफला अभिनय करायला लाव. मी त्यावेळी फार रागावलेलो आणि तरुण होतो. मी म्हटलं ठीक आहे, तू बघ मी करुन दाखवतो".

विधू विनोद चोप्रा यांनी जॅकी श्रॉफला स्क्रिप्ट ऐकवल्यावर त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा केला. "तो मला पहिली गोष्ट म्हणाला की, भिडू तू सांभाळून घे. मला अभिनय येत नाही. तू सांभाळ सगळं," असं विधू विनोद चोप्रा म्हणाले. यावेळी जॅकीला बरं वाटावं यासाठी मी त्याला काश्मीरमधील एका गुरुने मंत्र दिल्याचं सांगितलं. 

'म्हणून मी 19 वर्षं तुझ्यासह काम केलं नाही', नाना पाटेकरांनी मुलाखतीतच अनिल कपूरला झापलं, 'तू एवढा बकवास माणूस...'

 

"मी त्याला सांगितलं, मी तुला तो देतो. तो मंत्र रोज सकाळी 100 वेळा म्हणायचा आणि सर्व काही ठीक होईल. मी तो मंत्र लिहिला आणि त्याला पाठवला. 15 मिनिटांनी त्याने मला फोन करुन शिव्या घालायला सुरुवात केली. मी मंत्रात लिहिलं होतं, मी अभिनय करु शकतो. मी त्याला म्हटलं तुझा विश्वास नसेल तर तुला हे बोलावं लागेल. अन्यथा तू कसं करणार?," अशी आठवण विधू विनोद चोप्रा यांनी सांगितली. 

विधू यांनी सांगितलं की, जॅकीची सर्वात मोठी समस्या ही होती की सीन केल्यानंतर तो मार्कवर येत नसे. सीन करताना त्याला ठराविक मार्कवर यायचं असे, जेणेकरुन कॅमेरा त्याला योग्यप्रकारे पकडेल. पण त्याला नेहमीच समस्या होती. यावर मात करण्यासाठी विधू यांनी सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान यांना सीन अशाप्रकारे लाईट करण्यास सांगितला की मार्कची गरज भासणार नाही. मी कॅमेरामनला सांगितलं होतं की, त्याला जे हवं ते करु दे असं विधू यांनी सांगितलं.