विधानसभेचा रणसंग्राम संपला, आता मुंबईसह इतर महापालिकांसाठी सत्तासंघर्ष; कोण मारणार बाजी?

Municipal Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानं राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.  

Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2024, 08:34 PM IST
विधानसभेचा रणसंग्राम संपला, आता मुंबईसह इतर महापालिकांसाठी सत्तासंघर्ष; कोण मारणार बाजी? title=
पालिका निवडणूक

Municipal Election: महाराष्ट्रातील विधानसभेचा रणसंग्राम संपलाय. महायुतीनं प्रचंड बहुमत विधानसभेत मिळवल्यानं मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. यात मुंबई पालिकेसह राज्यातील इतर महापालिकेंसाठी सत्तासंघर्ष सुरू होणार आहे.  

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानं राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.  महायुतीतले नेते महापालिकेच्या निवडणुका घेण्यास अनुकूल असल्यानं राज्यात पुन्हा एकदा मिनी विधानसभेचा रणसंग्राम सुरू होण्याची शक्यता आहे.मुंबई कुणाची हे आम्ही सिद्ध केलंय, शिवसेना महापालिका निवडणुकीसाठी तयार आहे,असं सूचक वक्तव्य खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय.
 
दुसरीकडे महाविकास आघाडीनं विधानसभेत निराशाजनक कामगिरी केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे  लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्ट्राईक रेटमध्ये कोण तळाला?

महायुतीनं 80 टक्के स्ट्राईकच्या रेटनं 230 जागा जिंकल्या आहेत. तर मविआनं 15 टक्के स्ट्राईकच्या रेटनं 46 जागा जिंकल्या आहेत. महायुती स्ट्राईक रेट- 80 टक्के तर मविआ स्ट्राईक रेट - 15 टक्के आहे.
महायुतीच्या महाविजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. महायुती आणि महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे म्हणजेच 88 टक्के आहे. भाजपनं 149 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 132 जागांवर विजय मिळवलाय. महायुतीत भाजपनंतर स्ट्राईक रेटमध्ये दुस-या क्रमाकांवर आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 72 टक्क आहे. शिवसेनेनं 81 जागा लढवल्या होत्या 57 टक्के जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी तिस-या स्थानी आहे. राष्ट्रवादीनं 59 जागा लढवल्या होत्या 41 जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा 68 टक्के एवढा आहे. लोकसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा सर्वाधिक होता. मात्र,विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा एकदम तळाला गेलाय. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त दहा जागा जिंकल्यानं स्ट्राईक रेट हा फक्त 10 टक्क्यांवर आलाय. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे. 95 पैकी 20 जागा जिंकत शिवसेना युबीटीचा स्ट्राईक रेट हा 21 टक्के आहे. तर काँग्रेसनं 101 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 16 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा 15 टक्के आहे.निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्षाचा राहिलाय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत तिप्पट वाढलीय. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला 3.60 टक्के मते मिळाली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकीत 9..01 टक्के मते मिळाली आहेत.