CSK मध्ये आता RRR चा जलवा; अष्टपैलू खेळाडूंची तिगडी मैदान गाजवणार

तब्बल 5 वेळा आयपीएल विजेती चेन्नई सुपरकिंग्स मेगा ऑक्शनमध्ये कोणाला निवडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. चेन्नईने मात्र पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या शिलेदारांनाच संधी दिली. 

पुजा पवार | Updated: Nov 24, 2024, 09:23 PM IST
CSK मध्ये आता RRR चा जलवा; अष्टपैलू खेळाडूंची तिगडी मैदान गाजवणार title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 (IPL 2025) साठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन पार पडणार असून पहिल्या दिवशी 2 कोटी बेस प्राईज असलेल्या खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली. यात सीएसकेने मोठा डाव टाकून त्याचे माजी खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आणि आर अश्विन (R Ashwin) यांना विकत घेतलं.  चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) ऑक्शनपूर्वी ऋतुराज गायकवाड, एम एस धोनी, शिवम दुबे, मथीश पथीराना, रवींद्र जडेजा या खेळाडूंना रिटेन केले तर इतर सर्व खेळाडूंना त्यांनी रिलीज केले. मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सीएसकेच्या पर्समध्ये 55 कोटी रुपये होते. तब्बल 5 वेळा आयपीएल विजेती चेन्नई सुपरकिंग्स मेगा ऑक्शनमध्ये कोणाला निवडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. चेन्नईने मात्र पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या शिलेदारांनाच संधी दिली. 

आर अश्विनची घरवापसी : 

2009 ते 2015 दरम्यान आर अश्विन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचाच भाग होता. मात्र त्यानंतर तो राइजिंग पुणे सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स अशा संघांकडूनही खेळला. आर अश्विन मागील काही वर्ष राजस्थान रॉयल्सचा भाग होता. मात्र मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आले. अश्विन मेगा ऑक्शनच्या टेबलवर आल्यापासून सीएसके त्याला खरेदी करण्यासाठी उत्सुक होती. मात्र राजस्थान रॉयल्स सुद्धा त्यांच्या जुन्या शिलेदाराला घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यानंतर काहीकाळ लखनऊ सुपर जाएंट्सने देखील बोली लावली. मात्र अखेर आर अश्विनसाठी चेन्नई सुपरकिंग्सने  9.75 कोटींची बोली लावून याला खरेदी केले.  अश्विनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 212 सामने खेळले असून 180 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 800 धावाही केल्या आहेत.

रचिन रवींद्रला सुद्धा CSK ने दिली संधी : 

आयपीएल 2025 मध्ये भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा ऑल राउंडर रचिन रवींद्र याला सीएसकेने विकत घेतले होते. त्यानंतर त्याला पदार्पणाची संधी सुद्धा दिली आणि रचिनने त्याचं सोनं सुद्धा केलं होतं. मात्र सीएसकेने आयपीएल 2025  ऑक्शनपूर्वी त्याला रिटेन केलं नाही. त्यामुळे रचिनने 1.5  कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनसाठी नाव नोंदवलं. रचिन ऑक्शनमध्ये येताच सीएसकेने त्याच्यावर बोली लावली.  काही संघांनी रचिनला खरेदी करण्यासाठी रस दाखवला मात्र अखेर रचिन रवींद्रला सीएसकेने 4 कोटींना खरेदी केलं.  आर अश्विन हा गोलंदाज असला तरी त्याच्यात ऑलराउंडर खेळाडू सारखी क्षमता आहे. हे त्याने अनेकदा भारताकडून आणि आयपीएलमध्ये खेळताना सुद्धा  सिद्ध केलंय. त्यामुळे आता सीएसकेकडे रवींद्र जडेजा, रचिन रवींद्र आणि आर अश्विनच्या रूपाने तीन ऑल राउंडर खेळाडू आहेत.