नवी दिल्ली : सोमवारी देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. राजस्थान आणि मध्य प्रदेशात बुडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या (आयएमडी) अंदाजानुसार, वायव्य भारतात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये आज जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
याशिवाय पूर आणि भूस्खलन होण्याच्या शक्यतेबाबत अनेक राज्यांना इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊ शकते. त्यामुळे उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता
सोमवारी दिल्लीत मुसळधार पावसामुळे हवामानात गारवा जाणवू लागल्याने लोकांना दिलासा मिळाला. मात्र, येत्या काही दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याच्या प्रादेशिक पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, मान्सून पुन्हा एकदा उत्तरेकडे वळला आहे आणि पुढील तीन दिवस तो राष्ट्रीय राजधानीच्या जवळच राहील. गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो.
बिहारमध्ये 81.56 लाख लोक प्रभावित
गंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सोमवारी बिहारमधील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. येथील पूराचा 16 जिल्ह्यातील 81.56 लाख लोकांना फटका बसला आहे. राज्यात पुरामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पाटण्यातील बक्सर, मुंगेर, भागलपूर, कहलगाव आणि दिघा घाटावरील गंगेच्या पाण्याची पातळी सोमवारी वाढली. पाटणाच्या गांधी घाटावर नदीची पाण्याची पातळी 48.62 मीटरपर्यंत पोहोचली आहे. बागमती, बारही गंडक, पुणपुण, खिरोई आणि घाघरा यांच्यासह इतर अनेक नद्या राज्यातील विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.
उत्तर प्रदेशातील 788 खेड्यांमध्ये पूर
उत्तर प्रदेशात 788 गावे पुरामुळे बाधित आहेत. राज्यातील आंबेडकर नगर, अयोध्या, आझमगड, बहराईच, बलिया, बाराबंकी, बस्ती, देवरिया, गोंडा, गोरखपूर, खेरी, कुशीनगर, मऊ, संत कबीरनगर व सीतापूर जिल्हे पूरग्रस्त आहेत. सारडा आणि सरयू-घागरा नद्यांनी अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीएसीच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यूपीमध्ये 1046 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
ओडिशामध्ये पुराचा धोका
ओडिशामध्येही अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसाने अनेक भागांत पूरसदृष्य परिस्थिती निर्माण केली आहे, रस्ते जलमय झाले आहेत. कच्ची घरे आणि पिके खराब झाली आहेत आणि दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. ओडिशामध्ये हवामान खात्याने 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे धरण भरले आहे. सोमवारी धरणाचे आणखी 12 दरवाजे उघडण्यात आले. मुसळधार पावसामुळे मयूरभंज बालासोर, भद्रक आणि सुंदरगड जिल्ह्यात पूर आल्यासारखे परिस्थिती आहे.
तेलंगणात जनजीवन विस्कळीत
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तेलंगणाच्या विविध भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि सखल भागात पाणी साचले आहे. गोदावरी नदीची पातळी 60.7 फूटांवर पोहोचली आहे. अशाप्रकारे पाण्याच्या पातळीने तिसरी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यात प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले आहे. सोमवारी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
आंध्रप्रदेश-आसाममध्ये नद्या धोक्याच्या पातळीवर
आंध्र प्रदेशातही गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे जवळपास दीडशे गावे बुडाली आहेत. गौतमी, वशिष्ठ आणि व्यनतेया या गोदावरीच्या उपनद्यांमध्येही पाण्याची पातळी वाढली आहे. वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम येथे तैनात करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी युद्धपातळीवर मदतकार्य करण्यास सांगितले आहे.
मध्य प्रदेशात २ मुलं बुडाली
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात दोन मुले पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाली. राजस्थानमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये जलाशयात 3 भावंडांसह 5 तरुण बुडाले. आसाममध्ये पूर आणि दरड कोसळल्यामुळे जीव गमावलेल्या एकूण लोकांची संख्या 138 झाली आहे. पूर-संबंधित घटनांमध्ये 112 जणांचा मृत्यू झाला तर भूस्खलनात 26 जणांचा मृत्यू झाला.
छत्तीसगड पूर परिस्थिती
छत्तीसगडमध्येही मुसळधार पावसानंतर पूरसदृश्य परिस्थिती आहे. हवामान खात्याने 20 ऑगस्टपर्यंत सुकमा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.