मुंबई : वाढत्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एक मोठा झटका बसणार आहे. 18 जुलैपासून अनेक गोष्टींवरच्या किंमती वाढणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंवर GST वाढल्याने आता ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. एसटीच्या 47 व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.
18 जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दर वाढणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. या वस्तूंचे नवे दर 18 तारखेपासून लागू होणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या महाग?
पनीर, लस्सी, ताक, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, इतर तृणधान्ये, मध, पापड, अन्नधान्य, मांस आणि मासे (फ्रोझन वगळता), तांदूळ आणि गूळ यांसारखी प्री-पॅकेज केलेली कृषी उत्पादने महाग होणार आहेत. त्यांच्यावरील कर वाढवण्यात आला आहे.
सध्या, ब्रँडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो, तर अनपॅक केलेल्या आणि लेबल नसलेल्या वस्तू करमुक्त आहेत.
टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्क महाग होईल, कारण त्यावर १८ जुलैपासून 5 % जीएसटी लागू होणार आहे.
चेकबूकसाठी बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर 18% जीएसटी लागू होईल.
रूग्णालयात रु. 5,000 पेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या खोल्यांवर (आयसीयू नसलेल्या) 5 टक्के जीएसटी आकारला जाईल.
याशिवाय अॅटलाससह नकाशे आणि शुल्कांवर आता 12 टक्के दराने जीएसटी लागू होईल.
दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल, जो पूर्वी लागू नव्हता.
- LED दिव्यांवर 18 टक्के GST आकारला जाणार आहे.
- ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर्स इत्यादींवर आधी 12 टक्के कर होता जो आता 18 टक्क्यावर करण्यात आला आहे.
कोणत्या गोष्टी होणार स्वस्त
18 जुलैपासून रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंची वाहतूक स्वस्त होणार आहे, कारण त्यावरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसिस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्रा-ऑक्युलर लेन्सेसवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
इंधनाच्या किमतीतून मालवाहतूक करणाऱ्या ऑपरेटर्सच्या भाड्यावर जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणला जाईल.