नवी दिल्ली : उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवस होता. अन्सारींना निरोप देताना केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मावळत्या उपराष्ट्रपतींना जोरदार चिमटे काढले.
राजदूत असताना अन्सारींनी पश्चिम आशियात सर्वात जास्त काळ घालवला. यानंतर ते अल्पसंख्याक आयोग आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्येही होते. तिथेही अन्सारी तशाच विचारांमध्ये होते, असं मोदी म्हणाले. पुढची १० वर्ष अन्सारींवर वेगळी जबाबदारी होती. या दहा वर्षांमध्ये त्यांना ठराविक कक्षेतूनच काम करावं लागलं असेल. त्यामुळे कदाचित त्यांची हे काम करताना घुसमट झाली असेल पण आता त्यांना मनासारखं बोलता येईल, असा चिमटा पंतप्रधान मोदींनी अन्सारींना काढला.
राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हमीद अन्सारींनी देशातली सध्याची परिस्थिती आणि मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं. देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना असल्याचं अन्सारी म्हणाले होते.