VIDEO : कर्नाटकी 'नाटका'च्या पार्श्वभूमीवर वाजपेयींच्या त्या भाषणाची आठवण

वाजपेयींनी लोकसभेमध्ये केलेलं भाषण सध्याच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. 

Updated: May 17, 2018, 06:29 PM IST

मुंबई : कर्नाटकमध्ये आता जी परिस्थिती आहे, तशीच स्थिती १९९६ साली केंद्रामध्ये होती... सर्वात मोठा पक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयींना सत्तास्थापनेची संधी देण्यात आली होती... पण बहुमताचं गणित जुळवण्यात यश न मिळाल्यामुळे अवघ्या १३ दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला... त्यापूर्वी त्यांनी लोकसभेमध्ये केलेलं भाषण सध्याच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. 

कर्नाटकात येडियुरप्पा घेणार शपथ

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर घोडेबाजार तेजीत आलाय. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा उद्या म्हणजे गुरुवारी शपथग्रहण करणार आहेत, असं भाजप नेते पी. मुरलीधर राव यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय. त्यामुळे, राज्यपालांनी जेडीएस आणि काँग्रेसचा दावा डावलून भाजपला कौल दिल्याचं उघड झालंय. आता, राज्यपालांवर केंद्रातून दबाव आहे का? तसंच राज्यपालांनी राज्यघटनेनुसार हा निर्णय घेतलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  उद्या सकाळी ९.०० वाजता येडियुरप्पा एकटेच शपथग्रहण करणार आहेत... इतर कोणतेही मंत्री उद्या शपथ घेणार नाहीत. त्यानंतर १५ दिवसांत भाजपला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.  

घोडेबाजार तेजीत?

कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार रंगात आल्याचं दिसत आहे. आपल्याच पक्षाची सत्ता स्थापन व्हावी यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यातच काँग्रेस पक्षाचे दोन आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं वृत्त समोर येत आहे. बेल्लारी जिल्ह्यातले दोन आमदार गळाला लागले असून दोघेही आमदार रेड्डी बंधूंच्या जिल्ह्यातले असल्याचं कळतंय.

काँग्रेस-जेडीएसची ११७ आमदारांची यादी

दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत ११७ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली. जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिलं नाही. मात्र ,घटनेला धरून निर्णय घेण्यात येईल असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय.