कर्नाटकात माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी खळबळ उडवली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी एस येडियुरप्पा यांनी मागील महिन्यात आपल्या निवासस्थानी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
एका महिलेने 81 वर्षीय बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आपण 2 फेब्रुवारीला बी एस येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी गेलो होतो. आपल्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी न्याय मिळावा आणि चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती गठीत करावी या मागणीसाठी महिला पोहोचली होती.
तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, बी एस येडियुरप्पा यांनी मुलीला खोलीत नेऊन दरवाजा बंद केला आणि लैंगिक अत्याचार केला. महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा आपण बी एस येडियुरप्पा यांच्याकडे जाब विचारला असता त्यांनी आपण खरंच तिच्यावर बलात्कार झाला आहे की नाही हे तपासत होतो. यानंतर बी एस येडियुरप्पा यांनी महिलेची माफी मागितली आणि याची कुठेही वाच्यता करु नका असं सांगितलं.
बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या कलम 8 (लैंगिक अत्याचार) आणि भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 (अ) (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपांवर बी एस येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "एक ते दीड महिन्यांपूर्वी ते (पीडित आणि तिची आई) माझ्या घऱी मदत मागत आले होते. मी त्यांनी घराच्या आत घेतलं होतं. त्यांची तक्रार ऐकल्यानंतर मी शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी फोन करुन याची दखल घेण्यास सांगितलं होतं. यानंतर मात्र ते माझ्याविरोधात बोलू लागले. यावेळी मला तिची काहीतरी आरोग्याची समस्या असल्याचं वाटलं. मी त्यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पाठवलं. ते चिंतेत असल्याने मी त्यांना काही पैसेही दिले होते. मला नंतर एफआयआर दाखल झाल्याची माहिती मिळाली. मी त्यात लक्ष घालत आहे. पण एखाद्याला मदत करण्याच्या बदल्यात हे मिळत आहे," अशी खंत बी एस येडियुरप्पा यांनी व्यक्त केली आहे.