Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मी मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शंभूराजे नऊ वर्ष स्वराज्याचे छत्रपती म्हणून होते. या काळात संभाजी महाराजांचीही स्वतंत्र राजमुद्रा होती. पण अनेकांना राजमुद्रा आणि त्याचा अर्थ माहिती नाहीये? आज या निमित्ताने जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक करण्यात आला. 1680 साली शिवरायांचे निधन झाले त्यानंतर एक 1681 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ते राज्यकारभार पाहू लागले. पण नवीन राज्य चालवण्यासाठी नवी राजमुद्रा लागते. संभाजी महाराज यांनी नवी राजमुद्रा तयार केली. संस्कृत भाषेत राजमुद्रा असून पिंपळाच्या पानावर आहे. त्यावर 16 बुरुज आहेत.
''श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।''
राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे. आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल.
याच राजमुद्रेच्या आधारावर संभाजी महाराजांचा राज्यकारभार चालवला होता. तसंच, शिवाजी महाराजांनी जशी राज्यात स्वतंत्र नाणी पाडली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनीदेखील राज्यभिषेकानंतर स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी आणलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभुराई असे म्हटलं जातं.
शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. 1646 मध्ये पहिल्यांदा या राजमुद्रेचा वापर करण्यात आला असं अभ्यासकांचे मत आहे. तसंच, 1680 पर्यंत या राजमुद्रेचा वापर केला जायचा.
''प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥
साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥''
प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.