Monali Thakur Hospitalized: सवार लूं आणि मोह मोह के धागे यांसारख्या दमदार गाण्यांसाठी प्रसिद्ध असणारी बॉलिवूड गायिका मोनाली ठाकूरची लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक प्रकृती बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मोनाली ठाकूर रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, उपस्थित असणाऱ्या लोकांनी सांगितले की, मोनाली ठाकूरची तब्येत अचानक बिघडली आणि तिने लगेच तिचा परफॉर्मन्स थांबवला. श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने तिला लगेच दिनहाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या टीमने तातडीने वैद्यकीय मदत घेतली. सध्या ती एका खासगी रुग्णालयात दाखल आहे.
मोनाली ठाकूर हेल्थ अपडेट
मोनाली ठाकूरने अद्याप तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिलेली नाहीये. तिची अचानक तब्येत बिघडल्याने चाहते देखील तिची तब्येतीबाबत बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोनाली ठाकूर प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने वाराणसीमध्ये तिची संगीत मैफल मध्यंतरी थांबवली होती. कारण तेथील मैफिलीसाठी योग्य तयारी आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे तिने सांगितले होते. तिने दुखापत होण्याची भीती देखील वर्तवली होती. त्यानंतर मोनालीने तिच्या चाहत्यांची माफी देखील मागितली होती. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, ती आणि तिची संपूर्ण टीम हा शो करण्यासाठी खूप उत्सुक होता. मात्र, तेथील व्यवस्थापनात दोष होता. सर्व काही चुकीचे होते.
मोनाली ठाकूर 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत
गायिका मोनाली ठाकूरने तिच्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये केली. जेव्हा तिने सिंगिंग रिॲलिटी शो 'इंडियन आइडल 2' मध्ये भाग घेतला होता. मोनाली 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. मोनालीने आतापर्यंत 100 हून अधिक गाणी गायली आहेत. याशिवाय तिने आत्तापर्यंत अनेक संगीत कार्यक्रम देखील केले आहेत. त्याचबरोबर मोनाली सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.