Sharad Pawar Ajit Pawar Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका तसेच राज्यसभा खासदार शरद पवार एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. मात्र आधी मंचावर बाजूबाजूला करण्यात आलेली अजित पवार आणि शरद पवार यांची आसनव्यवस्था अजित पवारांनी स्वत: बदलून घेतली. त्यानंतर अजित पवारांनी आणि शरद पवारांचं भाषण झालं. शरद पवारांनी भाषणामध्ये केलेली सूचना अजित पवारांनी लगेच मान्य केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडली. या सभेसाठी मंचावर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि विश्वस्त अजित पवार यांची बैठक व्यवस्था शेजारी शेजारी करण्यात आली होती. मात्र अजित पवार मंचावर आल्यानंतर त्यांनी नावाची पाटी बदलून घेतली. दोघांच्या खुर्च्यांमध्ये सहकार मंत्री बाबसाहेब पाटील यांची पाटी ठेवण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बघत अजित पवार यांनी आसन व्यवस्था बदलल्याची स्मितहास्य करत कल्पना दिली.
"राज्य सरकार आणि साखर कारखानदारी दोघांमध्ये जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या साथीने काम करावं लागतं," असं अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. गुळाच्या निमित्ताने काहींनी कारखाने काढले. गूळ, गूळ पावडर उत्पादन सुरू केलं. 2 हजार, अडीच हजार मेट्रिक टन क्षमतेचे कारखाने काढले. त्यावर बंधनं आणण्याचा विचार करतोय. ऊसाचे क्षेत्र कमी होत असताना कारखाने काढल्यामुळे अडचणी येतात. साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक आहे, असं अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं.
"साखर कारखान्यांना एकीकडे मदत करायची आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे मला पटत नाही. एफआरपी वाढते त्या प्रमाणात एमएसपी वाढत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी या प्रश्नांबाबत बोलणार आहे. कारखाने चालवताना चुका करू नका. नाहीतर काहीतरी गडबड करायची आणि मग माझ्याकडे येवून दादा आम्हाला वाचवा म्हणायचं. हे चालणार नाही," असा सूचक इशारा अजित पवारांनी कारखानदारांना दिला.
नक्की वाचा >> सैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार प्रयुत्तरात म्हटले, 'वेगळं काही..'
"सारखरेची एम एस पी वाढवावी अशी विनंती पंतप्रधान तसेच अमित शहा यांना केली आहे," असं अजित पवार म्हणाले. "व्हीएसआयकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांची रक्कम अतिशय कमी आहे. ती वाढवावी. 10 हजार दिले जात असतील तर ते एक लाख करावे. साहेब (शरद पवार) त्याबाबत अधिकारवाणीने बोलतील," असं अजित पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले.
पुण्यातील मांजरी बु. येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आदरणीय श्री. पवारसाहेबांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील, इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर सदस्य व अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/wRh7t2X09U
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2025
पुढील वर्ष ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे, असं शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं. ऊस उत्पादन वाढणार असल्यामुळे ठराविक काळात गाळप पूर्ण करणे आव्हान असणार आहे, याची कल्पना शरद पवारांनी भाषणात दिली. ऊसाच्या उत्पादनात आणखी वाढ व्हायला पाहिजे. त्यासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हायला पाहिजे, असंही शरद पवार भाषणात म्हणाले. शरद पवारांचा घसा खराब असल्याने त्यांना भाषणादरम्यान दम लागत होता. भाषण सुरु असतानाही शरद पवारांना अनेकदा खोकला येत होता. त्यामुळे ते थांबत थांबत बोलत होते. ऊस उत्पादन वाढ तसेच साखर कारखानदारी नफ्यात यावी यासाठी काय करायला पाहिजे याविषयी पवारांनी भाषणामधून मार्गदर्शन केलं.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच 'व्ही. एस. आय.'कडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची मागणी अजित पवारांनी आपल्या भाषणात केली होती. अजित पवारांची ही सूचना ऐकल्यानंतर आपल्या भाषणात शरद पवारांनी लगेच बक्षिसांची रक्कम वाढवत असल्याची घोषणा केली. 'व्ही. एस. आय.'कडून देण्यात येणाऱ्या 10 हजारांच्या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली. तसेच सर्वोत्कृष्ट कारखान्याला दिला जाणारा अडीच लाखाचा पुरस्कार यापुढे 5 लाखांचा करण्यात आला आहे. ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सल्ला देण्यासाठी व्हीएसआयकडून स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येईल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.