...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान

Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 23, 2025, 02:52 PM IST
...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान title=
युट्यूबवर बोलताना व्यक्त केलं मत

Champions Trophy 2025 Kaif: भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात एक महत्त्वाचं भाकित व्यक्त केलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेमध्ये एकाच परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करु शकतो असं या माजी क्रिकेटपटूचं म्हणणं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आली तरच भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत उत्तम कामगिरी करता येईल असं कैफने म्हटलं आहे. 

कोणत्या मैदानावर खेळवली जणार 

यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही 50 षटकांची खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार असून पाकिस्तानकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. मात्र भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळणार आहे. दुबईच्या मैदानावरील मागील तीन एकदिवसीय सामन्यांमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या अवघी 190 इतकी आहे. या मैदानावर फलंदाजांची सरासरी 23.4 इतकी साधारण आहे.

वर्ल्डकप फायनलमधील पराभव विसरुन त्यांनी...

"रोहित आणि विराट भारतीय संघासाठी खेळणार आहे. त्यांच्या हाती पुन्हा तिरंगा असेल असा विचार करुनच मला बरं वाटतंय. एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा अंतिम सामना पराभूत झाल्यानंतर ते आगामी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. त्यांनी त्या पराभवातून सावरत टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे," असं कैफने त्याच्या युट्यूब अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

...तरच आपण दुबईमधील सामने जिंकू शकतो

"रोहित आणि विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळावं. एकजण 37 वर्षांचा आहे तर दुसरा 36 वर्षांचा. ते आता फार वर्ष खेळणार नाहीत. तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्या कारण संघाला देण्यासाठी त्यांच्याकडे अजूनही बरंच काही आहे. रोहित शर्मा वेगाने धावा करत चांगली सुरुवात करुन देतो. विराट कोहली मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पाया रचायला मदत करतो. विराट अगदी शेवटपर्यंत खेळतो. म्हणूनच हे दोघे खेळले तरच आपण दुबईमधील सामने जिंकू शकतो," असं कैफ म्हणाला.

दोघांची कामगिरी कशी?

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारताने टी-20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अमर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच कसोटीमध्ये विराट आणि रोहितला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. नुकतीच झालेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुद्धा दोघांसाठी म्हणावी तशी गेलेली नाही. मात्र एकच समाधानाची बाब म्हणजे रोहित आणि विराटने 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. 2023 पासून विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1435 धावा केल्या आहेत. विराटची सरासरी 65.23 इतकी आहे. तर रोहितने या फॉरमॅटमध्ये 52.3 च्या सरासरीने धावा केल्यात.