फोटोमध्ये डोळ्यांचा रंग असा लाल का दिसतो? हे आहे त्या मागील कारण

आपल्यापैकी प्रत्येकालाच फोटो काढायला फार आवडते. ज्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे बाजारात उपलब्ध असलेले कॅमेरा विकत घेतो.

Updated: May 3, 2022, 05:22 PM IST
फोटोमध्ये डोळ्यांचा रंग असा लाल का दिसतो? हे आहे त्या मागील कारण title=

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकालाच फोटो काढायला फार आवडते. ज्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे बाजारात उपलब्ध असलेले कॅमेरा विकत घेतो किंवा चांगला फोटो विकत घेतो, ज्यामुळे फोटो चांगले येतील. परंतु तुम्ही एक गोष्ट पाहिलीय का की, जेव्हा कॅमेरा कोणताही असो, जेव्हा आपण त्यामधून एखाद्या व्यक्तीचा फोटो काढतो, तेव्हा त्यांचे डोळे फोटोमध्ये लाल रंगाचे दिसू लागतात. परंतु फोटोमध्ये असे का होतं? यामागचं कारण तुम्हाला माहितीय का?

हे मुख्यतः हे तेव्हाच घडते, जेव्हा फोटो रात्री काढला जातो, तोही फ्लॅशलाइटमध्ये. याचे थेट कारण म्हणजे डोळ्याच्या बुबुळावर पडणारा प्रकाश. डोळ्याच्या रेटिनावर जितका जास्त प्रकाश पडेल, तितकं बुबुळ लाल दिसण्याची शक्यता जास्त असते. आता तुम्हाला हे कशामुळे होतं, हे लक्षात आलं, परंतु आता असं का होतं, जाणून घेऊ.

सायन्सएबीसीच्या अहवालानुसार, रात्रीच्या वेळी डोळ्यांवर फ्लॅश लाइट पडते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु या तेजस्वी लाईटीचा प्रभाव रेटिनावर दिसून येतो.

जेव्हा डोळयातील पडदा प्रकाशाच्या किरणांना एकत्रितपणे परावर्तित करते, तेव्हा त्या भागातील रक्तवाहिन्यांमुळे फोटोमध्ये लाल ठिपका दिसून येतो आणि कॅमेरा हे प्रतिबिंब कॅप्चर करतो.

विशेष म्हणजे डोळ्यांवर दिसत असलेला हा लाल ठिपका, सर्वच फोटोंमध्ये एक सारखा दिसत नाही. म्हणजेच त्याचा रंग बदलत असतो. काही ठिकाणी हा डाग गडद, तर काहींमध्ये हलका असतो. त्याचे स्वतःचे एक विज्ञान देखील आहे.

अहवालानुसार, डोळ्यात दिसणारा लाल डाग गडद आहे की फिकट, हे सर्व रेटिनाच्या थरामध्ये असलेल्या मेलेनिनच्या प्रमाणावर अवलंबून असते. जसे की ज्या लोकांचा रंग गोरा आहे त्यांच्या डोळ्यांवर हा स्पॉट गडद दिसतो. त्याच वेळी, डार्क रंग असलेल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये हा स्पॉट हलका लाल रंगाचा दिसतो.