नवी दिल्ली : सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.
एफडीसंबंधी टॅक्स चोरी करणाऱ्या पाच लाख किंवा त्याहून अधिक लोकांवर आयकर विभाग लक्ष ठेऊन आहे. तुम्ही जर टॅक्स पे करत नसाल तर, अशा टॅक्स चोरांच्या यादीत तुमचेही नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडून (सीबीडीटी) प्राप्त माहितीनुसार, केवळ व्यवसाय, नोकरी करत असलेली मंडळीच नव्हे तर, ज्येष्ठ नागरिकही आयकर विभागाच्या या चौकशी कक्षेत येऊ शकतात. जे लोक वेळेवर कर भरत नाहीत तसेच, आयटी रिटर्न फाईलही करत नाहीत, अशी मंडळी या चौकशीत अग्रक्रमावर असतील.
टॅक्स बेस वाढविण्यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. एफडीवरील टॅक्स चोरांवर कारवाई हासुद्धा याच प्रयत्नांचा भाग आहे. जे लोक रोख स्वरूपात कमाई करतात अशा मंडळींवरही आयकर विभाग कारवाई करणार आहे. तसेच, जे लोक ऐशोआरामाचे जीवन जगतात, उंची गाड्या वापरतात, घरांमध्येही उंची सुखसोईंचा लाभ घेतात पण आपल्या व्यवहारांची कोणतीही माहिती सरकारला देत नाहीत, अशा मंडळींवरही कारवाई करण्यात येणार आहे.