Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात 2 ते 3 अंशांची घट अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे. शहरात गारठा परतताना दिसत आहे. असं असलं तरीही दुपारच्या वेळी जाणवणारा उष्मा मात्र पाठ सोडताना दिसत नाहीय. पुढील 48 तास या भागांमध्ये हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशासह केरळच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, त्यामुळं चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. त्यातच उत्तरेकडून सातत्यानं शीतलहरींचा सुरु असणारा मारा आणि पश्चिमी झंझावातामुळं राज्यातील तापमानात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवस मुंबईतील तापमानात चढ - उतार सुरू असून, गारठा वाढला असला तरीही दिवसभराचं तापमान वाढत असल्यानं ऊन्हाचा दाह अधिक त्रासदायक ठरत आहे. शनिवार आणि रविवारी शहरातील कमाल तापमान 32 ते 33 अंशांदरम्यान राहणार असून, 16 ते 18 अंशांदरम्यान राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारताला आयएमडीनं कडाक्याच्या थंडीसह जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. तर, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या उत्तरेकडे सध्या पश्चिमी झंझावात आणि दक्षिणी वाऱ्यांमुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत असून, 24 जानेवारीनंतर ही स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
During the next 24 hours, scattered #rain & #snowfall are possible over Arunachal Pradesh. Light rain may occur over Western parts of Uttar Pradesh, Southern Andaman & Nicobar Islands and Lakshadweep. #Skymet #Forecast #Rain
Read the full forecast: https://t.co/f7TLARS5rm— Skymet (@SkymetWeather) January 23, 2025
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता असून, उत्तर प्रदेशातील पश्चिम क्षेत्र, अंदमान आणि निकोबार बेटांसह लक्षद्वीप इथंही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात थंडीचा ऋतू सुरू असतानाच बदललेल्या हवामान प्रणालीमुळं पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, आसाम, मेघालय सह हिमाचलचा काही भाह आणि पूर्व राजस्थानमध्ये दाट धुक्यासह पावसाच्या तुरळक सरींचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल, आसाम आणि लक्षद्वीपमध्ये काही भागांत मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा असल्यानं नागरिकही सतर्क आहेत.