भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख पार, फक्त चार दिवसांत १ लाख रूग्ण

 कोविड - १९ चाचण्यांच्या आकडेवारीने १ कोटींचा टप्पा ओलांडला

Updated: Jul 7, 2020, 06:47 AM IST
भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख पार, फक्त चार दिवसांत १ लाख रूग्ण  title=

मुंबई : देशात चार दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा उच्चांक गाठत असताना एकूण रूग्ण सात लाखाच्या जवळपास झाले आहेत. चार दिवसांत भारतात एक लाख कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. 

देशांत संक्रमणामुळे २0 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी Covid-19 ची चाचण्यांची संख्या एक करोडहून अधिक आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४,२४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ६ लाख ९७ हजार ९१३ इतका पोहोचला आहे. तर यामध्ये मृतांचा आकडा हा १९ हजार ६९३ इतका आहे.

भारतातील कोविड - १९ चाचण्यांच्या आकडेवारीने १ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR) सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत, सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत देशात १,००,०४,१०१ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनाच्या आकडेवारीत भारताने रशियाला देखील मागे टाकलं आहे. भारत त्या टॉप तीन देशात आहे जेथे कोरोनाचं संक्रमण सर्वाधिक आहे. अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. भारतात कोरोनाने शिरकाव केल्यापासूनच कोरोना टेस्टची सुरुवात झाली होती. देशातील विविध लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली जात होती. यापूर्वी सरकारने केवळ सरकारी लॅब आणि सरकारी रुग्णालयांनाच कोरोना चाचण्या घेण्यास परवानगी दिली होती. परंतु कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्यांनी आपल्या निर्णयात बदल करत काही खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना तपासणीसाठी परवानगी दिली. सोमवारी या कोरोना चाचण्यांनी ११ वाजता १ कोटींचा आकडा ओलांडला आहे.