मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहेे. ही चिंतेची बाब असली तरी एक बाब समाधानाची पुढे आली आहे. देशाततील कोरोना विषाणू बाधित रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करु शकतो, असे चित्र दिसून येत आहे.
देशात कोरोना बाधितांचा आकडा ७८००३ इतका असून २६२३५ रुग्ण बरे झाले आहेत. तर २५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २५९२२ इतका आहे. आतापर्यंत राज्यात ५५४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ९७५ जणांना आतार्यंत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
देशात कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुपटीचा वेग गेल्या तीन दिवसांत कमी होऊन तो १३ पूर्णांक ९ दिवसांवर आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे. गेल्या २४ तासांत देशातल्या एकूण १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, असे ते यावेळी म्हणाले.
आपल्या देशाने दिवसाला कोरोना विषाणूच्या १ लाख चाचण्या करण्याची क्षमता विकसित केली असून कोबास ६८०० उपकरणाच्या मदतीने २४ तासांत अंदाजे १२ शे नमुन्यांची दर्जेदार चाचणी करता येईल असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणालेत.