कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

'प्रवाशी कृपया इथ लक्ष द्या' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना 

Updated: May 11, 2022, 06:16 PM IST
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आताची एक महत्त्वाची बातमी. तुम्ही जर रेल्वेने (Railway) प्रवास करत असाल तर आता तुम्हाला पुन्हा मास्क (Mask) वापरावा लागणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केलं आहे. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी सर्व झोनच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांना पत्र पाठवून याबाबतच्या सूचना कळवल्या आहेत.

22 मार्च रोजी कोविड (Covid-19) संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचे पालन करावं, असं रेल्वेनं म्हटलं आहे. . रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरात प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचना केल्या आहेत.  पण ही मास्क सक्ती नसल्याचंही रेल्वेने स्पष्ट केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या (Corona) चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता, प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात आलं आहे. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे. 

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर रेल्वेने मास्कची अट रद्द केली होती. तेव्हापासून रेल्वे प्रवाशांना मास्कशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करता येत आहे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये पूर्वीप्रमाणेच पॅन्ट्री आणि बेडिंगही सुविधाही सुरु करण्यात आली आहे. मात्र आता देशात कोरोनाचा वाढता वेग पाहता रेल्वे मंत्रालयाने पुन्हा कोविड नियमांचं पालन करण्यास सुरुवात केली आहे.