Business News: देशातील मोठमोठ्या उद्योजकांची नावं विचारली, तर काहींचा उल्लेख हमखास होतो. यातीलच एका बड्या उद्योजकानं त्याच्या मुलांना इतकी मोठी भेट दिली आहे की, शेअर बाजार आणि उद्योग क्षेत्रामध्येही हीच चर्चा सुरु आहे. कारण, या उद्योजकानं त्यांच्या मुलांना खऱ्या अर्थी मालामाल केलं आहे.
हे उद्योजक आहेत अझीम प्रेमजी. Wipro या जागतिक स्तरावरील संस्थेचे सर्वेसर्वा असणाऱ्या अझीम प्रेमजी यांची ओळख भारतातील एक प्रथितयश उद्योजक अशी असण्यासोबतच आणखी एक ओळखही कायमच प्रशंसेस पात्र ठरते. ही ओळख म्हणजे एक दानशूर उद्योजक. समाजोपयोगी कामं आणि तत्सम कारणांसाठी प्रेमजी कायमच सढळ हस्ते मदत करतात आणि त्यांच्या या मदतीच्या बळावर अनेकांनाच मोठा आधार मिळतो. अशा या अझीम प्रेमजी यांनी पुन्हा एकदा कमालच केली आहे.
विप्रो उद्योग समुहाची धुरा एकहाती सांभाळणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या मुलांना एक अतिशय अनपेक्षित आणि तितकीच महागडी भेट दिली आहे. प्रेमजी यांनी तारीक आणि रिशाद या त्यांच्या दोन मुलांना 1 कोटी रुपयांचे शेअर दिले आहेत. सध्याच्या दरानुसार या शेअरची किंमत तब्बल 500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
78 वर्षीय प्रेमजी मागील आठवड्यापर्यंत प्रेमजी यांच्याकडे 22.58 रुपयांहून अधिक शेअर्स होते. पण, आता stock exchanges कडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमजी यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येकी 51,15,090 शेअर्स दिल्यामुळं ही उद्योगजगतातील सर्वात मोठी बाब ठरत आहे.
प्रेमजी यांनी केलेल्या या व्यवहारानंतर आता विप्रोच्या कुटुंबीयांकडे कंपनीचे 4.43 टक्के शेअर असणार आहे. खुद्द अझीम प्रेमजी यांच्याकडे कंपनीचे 4.12 टक्के शेअर असून, त्यांच्या पत्नी यास्मीन यांच्याकडे 0.05 टक्के शेअर आहेत. तर, आता त्यांच्या मुलांकडे 0.13 टक्के शेअर असतील. उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षी विप्रोच्या प्रमोटर्सडे 72.9 टक्के शेअरची भागिदारी होती. Hasham Traders, Prazim Traders आणि जश ट्रेडर्स अशा तीन भागिधारकांमध्ये विप्रोचे 58 टक्के शेअर्स आहेत. अझीम प्रेमजी समाजकार्यासाठीच्या संस्थेकडे आणि अझीम प्रेमजी धर्मदाय संस्थेकडे अनुक्रमे 0.27 टक्के आणि 10.18 टक्के शेअरची मालकी असून, हशम इन्वेस्टमेंट आणि ट्रेडिंग कडे उर्वरित 0.03 टक्के शेअर आहेत.