भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, संतप्त कार्यकर्त्यांचा रुग्णालायबाहेर ठिय्या

BJP Yuva Morcha worker murdered in Karnataka: कर्नाटकातील दक्षिण कन्नडातल्या बेल्लारेमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.  

Updated: Jul 27, 2022, 01:30 PM IST
भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, संतप्त कार्यकर्त्यांचा रुग्णालायबाहेर ठिय्या title=

बंगळुरु : BJP Yuva Morcha worker murdered in Karnataka: कर्नाटकातील दक्षिण कन्नडातल्या बेल्लारेमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. प्रवीण नेटारु, असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. प्रवीण नेटारु भाजपच्या युवा संघटनेचा जिल्हा सचिव होता. आपल्या पोल्ट्री फार्म बंद करत असताना बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली. हत्येची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालायबाहेर ठिय्या आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. 

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात ही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सुलिया तालुक्यातील बेल्लारे आणि इतर ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. युवा मोर्चा नेत्याच्या हत्येची बातमी संपूर्ण परिसरात पसरताच मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस स्टेशनला घेरले आणि मोठा गोंधळ घातला. 

विशेष म्हणजे मंगळवारी रात्री हा युवक पोल्ट्रीचे दुकान बंद करुन घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. दुचाकीवर केरळचा नोंदणी क्रमांक होता. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेतरू यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बेल्लारे पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. नेतरू यांचा मृतदेह ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे, त्या हॉस्पिटलसमोरही काही संघटनांनी निदर्शने केली.

परिसरात बंदची हाक

या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) बुधवारी जिल्ह्यातील सुलिया, कडबा आणि पुत्तूर तालुक्यात बंदची हाक दिली आहे. बेल्लारीतील आणखी एका खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुलिया आणि लगतच्या तालुक्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. बेल्लारीमध्ये तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी परिसरातील सर्व दुकाने, आस्थापना आणि हॉटेल्स लोकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर बंद केली.

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी हत्येमागे पीएफआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले, 'जोपर्यंत सध्याचे भाजप सरकार पीएफआयवर बंदी घालत नाही, मारेकऱ्यांचे एन्काउंटर करत नाही, फाशी देत ​​नाही, तोपर्यंत हिंदू कार्यकर्त्यांची अशीच हत्या होत राहील.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास  

दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हृषिकेश सोनवणे यांनी सांगितले की, तपास सुरु आहे, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. हल्लेखोर केरळमधून येण्याच्या शक्यतेवर अधिकाऱ्याने सांगितले की, असे होऊ शकते. आम्ही वेगवेगळ्या घटनांक्रमावर काम करत आहोत. आम्ही त्याची चौकशी करत आहोत.