उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे कोर्टानेही आश्चर्य व्यक केलं आहे. एका तरुणाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात चार वर्षांचा कारावास भोगावा लागला. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. जर साक्ष देणाऱ्या तरुणीने आपली साक्ष मागे घेतली नसती तर तिने खोटे आरोप केल्याचं कधीच उघड झालं नसतं.
सत्यता समोर आल्यानंतर कोर्टाने तरुणाची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही कोर्टाने तरुणीला तितक्याच दिवसांची शिक्षा सुनावली आहे, जितके दिवस तरुण न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात होता. याशिवाय तिला आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे. कोर्टाने सांगितलं की, जर तरुण बाहेर असता तर मजुरी करुन आतापर्यंत 5 लाख 88 हजारांची कमाई केली असती. ही रक्कम तरुणीकडून वसूल केली जावी, असं न झाल्यास तिला सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल असं कोर्टाने सांगितलं आहे.
पीडित तरुण अजय उर्फ राघव ने सांगितलं की, 2019 मध्ये तरुणीची मोठी बहीण माझ्याकडे प्रोग्रामसाठी आली होती. त्यांनी आम्हाला प्रोग्राम शिकायचा आहे असं सांगितलं. यासाठी आम्ही त्यांच्या घऱी जायचो. जिथे कार्यक्रम असायचा तिथे नितूचा पतीही सोबत असे. त्यांच्या कुटुंबीयांनाही आम्ही कुठे आहोत हे माहिती असायचं.
पुढे तो म्हणाला, "माझ्यावर अपहरण आणि बलात्काराचा खोटा आरोप करण्यात आला. माझं करिअर बर्बाद करण्यात आलं. आता मी कुठेही गेलो तरी लोक माझ्याकडे संशयाने पाहततात. पण कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. जितके दिवस मी जेलमध्ये होतो, आता तितकेच दिवस तिला जेलमध्ये राहावं लागणार आहे. तिला मला 5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. कोर्टाने मला दोषमुक्त केलं असलं तरी माझ्यावर लागलेले डाग पुसले जाणार नाहीत".
आपले मत मांडताना पीडित राघवने सांगितले की, या प्रकरणी न्यायालयात मुलीने आपली साक्ष फिरवली. यापूर्वी तिने सांगितलं होतं की ती निरक्षर आहे आणि तिला लिहिणं वाचणं माहित नाही. पण सही करण्याची पाळी येताच मुलीने इंग्रजीत सही केली, त्यानंतर न्यायाधीशांना समजलं की मुलगी खोटे बोलत आहे आणि मुद्दाम तरुणाला अडकवत आहे. त्यानंतर न्यायालयाने तरुणाची निर्दोष मुक्तता केली आणि तरुणीला शिक्षा सुनावली. या संपूर्ण प्रकरणात तरुणीवर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेत न्यायालयाने कठोर भूमिका घेत म्हटलं की, "अशा महिलांच्या कृत्यामुळे खऱ्या पीडितांनाच नुकसान सहन करावं लागतं. ही समाजासाठी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस आणि न्यायालय या माध्यमांचा वापर करणं आक्षेपार्ह आहे. महिलांना पुरुषांच्या हितसंबंधांवर आक्रमण करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही".