Medical Law Suit: चीनमधील एका महिलेबरोबर फारच धक्कादायक प्रकार घडला आहे. गाओ नावाच्या या महिलेने तिच्या ब्रेस्ट सर्जरीचा व्हिडीओ तेथील ड्युईन नावाच्या सोशल मीडिया वेबसाईटवर व्हायरल झाल्याचं पाहिल्यानंतर तिला नेमकं काय घडतंय हे समजेनासं झालं. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये या महिलेने शस्त्रक्रीया करुन घेतली होती. त्यानंतर अनेक महिन्यांनी तिला हा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सुंदर दिसण्यासाठी या महिलेने आपल्या स्तन अधिक रेखीव दिसावेत या उद्देशाने शस्त्रक्रीया करुन घेतली होती. या शस्त्रक्रीयेनंतरही गाओ बराच काळ औषधाच्या धुंदीत होती. खरं तर गाओबरोबर इतर अनेक महिलांवर त्यावेळेस अशा प्रकारे शस्त्रक्रीया झाली होती. या सर्वांना अॅनेस्थेशिया देण्यात आलेला. त्याचवेळी तिच्या न कळत हा व्हिडीओ काढण्यात आल्याचा तिचा दावा आहे.
स्तनांच्या शस्त्रक्रीयेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाओने ही कृती म्हणजे आपल्या खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. ज्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रीया झाली त्याच्याविरोधात व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी गाओने केली आहे. हा व्हिडीओ नेमका कोणी शूट केला याची माहिती घेण्यासाठी तिने रुग्णालयाशी अनेकदा संपर्क केला. तिने अनेक उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांची भेट घेत आरोपीला शोधण्यासंदर्भात मागणी, विनंत्या केल्या. मात्र रुग्णालयाने घडलेल्या प्रकाराचा अनेक महिने होऊन गेल्याने रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही आरोपी शोधणं शक्य होणार नाही असं गाओला सांगितलं. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतं असं तिला सांगण्यात आलं.
गाओने या रुग्णालयावर गंभीर आरोप करताना, ऑपरेशन थेअरटरसारखी जागा फार सुरक्षित मानली जाते असं म्हटलं आहे. या ठिकाणी रुग्णालयाशी संबंधित व्यक्ती वगळता कोणीही येऊ शकत नाही. रुग्णालयाने यासंदर्भात माहिती देताना ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे तो नोकरी सोडून गेला आहे. त्याचा पत्ता आणि संपर्कासंदर्भातील सर्व माहिती रुग्णालयाच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आल्याने कोणतीही मदत करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
गाओने या प्रकरणामध्ये रुग्णालयाला कोर्टात खेचलं आहे. या प्रकरणाची सध्या चीनमध्ये चांगलीच चर्चा सुरु असून सोशल मीडियावरुन यासंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाने या प्रकरणानंतर दिलेली उडवाउडवीची उत्तरं आणि घेतलेली भूमिका संक्षयास्पद असल्याचं अनेकांचं म्हणणं असून घडलेल्या प्रकारासाठी रुग्णालय उत्तर देण्यास बांधील असल्याचं म्हटलं आहे.
गोआने ज्या वकिलाकडे हे प्रकरण सोपवलं आहे त्या मा बिन नावाच्या वकिलाने व्हायरल व्हिडीओमध्ये महिलांचे चेहरेही दिसत असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे महिलांच्या संमतीशिवाय त्यांची ओळख पटेल अशापद्धतीने चित्रिकरण करुन व्हायरल करणे हे खासगी आयुष्यासंदर्भातील कायद्याचं उल्लंघन असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ रुग्णालयाच्या पूर्वीच्या कर्मचाऱ्याने व्हायरल केलेला असो किंवा इतर कोणीही ती व्यक्ती शिक्षेस पात्र असल्याचा वकिलांचा दावा आहे.